मुंबई- 'मेट्रो कारशेड हटवा, आरे वाचवा', या मागणीसाठी आरे कॉलनीमध्ये रोज हजारो लोक मानवी साखळी उभी करून या वृक्षतोडीला विरोध करत आहेत. सरकारच्या या निर्णयाविरोधात आज मुंबई छात्रभारती संघटनेच्या विद्यार्थ्यांनीही मानवी साखळी आंदोलनात सहभाग घेतला.
आरे वाचवासाठी छात्रभारतीच्या विद्यार्थ्यांची निदर्शने सरकारने आरेच्या जंगलातील अडीच हजार झाडे तोडून मेट्रो कारशेड उभा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आरे जंगल म्हणजे मुंबईकरांचे हृदय होय. हेच आरे जंगल मुंबईकरांचा कार्बन डायऑक्साईड शोषून घेते व ऑक्सिजनचा पुरवठा करते. विकासासाठी पर्यावरणाचा ऱ्हास नको. निसर्गानं पदरात टाकलेलं हरितदान उद्ध्वस्त करणारा विकास कोणासाठी व मुंबईचे फुप्फुस नष्ट करून सरकारला काय मिळेल? असा सवाल सामान्य लोकांपासून ते राजकीय व सेलेब्रिटी मंडळींनी केला आहे. मेट्रो-३ प्रकल्पासाठी कारडेपो उभारण्याच्या हेतूने आरे वसाहतीतील दोन हजारांहून अधिक झाडे तोडण्यास मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने मान्यता दिल्यानंतर या निर्णयाला सर्वच स्तरांतून विरोध होत आहे. विविध संस्था, संघटना नागरिकांच्या 'आरे वाचवा' चळवळीला पाठिंबा देत विरोध करण्यासाठी आरे जंगलात येत आहेत. हजारो लोक या मोहिमेत आरे जंगल वाचवण्यासाठी जोडली आहेत. त्यात आज विद्यार्थी संघटना देखील सहभागी झाली आहे.हेही वाचा- आरे वृक्षतोड प्रकरणी पालिका प्रशासनाचा रेटा कशासाठी - मनीषा कायंदे