मुंबई - आजपासून सुरू होणारे राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी विरोधकांनी भात्यातील बाण काढले आहेत. तर दुसरीकडे विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी व्यूहरचना आखली आहे. हे अधिवेशन यामुळे वादळी ठरण्याची शक्यता आहे.
आजपासून तीन आठवड्यांच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. 11 मार्चला अर्थसंकल्प सादर होणार आहे. 25 मार्चपर्यंत अधिवेशन चालेल. हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेण्याऐवजी मुंबईत घेण्यात आले. विरोधकांनी यावरून राळ उठवली होती. तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूर घेण्याची आग्रही मागणी लावून धरली होती. आघाडी सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशन देखील मुंबईत घेऊन विरोधकांच्या मागणीला केराची टोपली दाखवली आहे. विरोधक यामुळे आक्रमक झाले आहेत. गोंधळात अधिवेशनाची सुरुवात होण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातील दोन आमदारांचा आधीच राजीनामा झाला आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक विरोधकांच्या रडारवर आहेत. विरोधी पक्षाकडून यावरुन सरकारला कोंडीत पकडले जाईल. तर विरोधकांना न जुमानता कामकाज करण्यावर सत्ताधाऱ्यांचा भर असेल. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी घेतलेल्या सत्ताधाऱ्यांच्या बैठकीत विरोधकांची रणनीती मोडीत काढण्याबाबत व्यूहरचना आखली गेली आहे. सत्ताधारी आणि विरोधक यामुळे एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.
सर्वसामान्यांचे मुद्द्यांना बगल?
राज्यात शेतकऱ्यांना पीकविमा आणि वीजबील माफीचा ज्वलंत मुद्दा आहे. आपत्तीकाळात सरकारने माफी जाहीर केली. परंतु, अद्याप आपत्तीग्रस्तांना ती मिळालेली नाही. परीक्षा नियोजनातील अनियमितता, एसटी संप अजून मोडीत निघाला नाही. सर्वसामान्य जनता यात भरडली जात आहे. विरोधक केवळ राजकिय मुद्द्यांवरून सरकारला टार्गेट करत आहे. सत्ताधारीकडून प्रत्युत्तर दिले जात आहे. या राजकीय स्टंटबाजीमुळे सर्वसामान्यांच्या मुद्द्यांना बगल देण्याचा खटाटोप सुरू असल्याचे बोलले जात आहे.
मुख्यमंत्र्यांची उपस्थिती लक्षवेधी ठरणार
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज सुरुवात होणार असली तरी बऱ्याच दिवसानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानभवनात येणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची उपस्थिती लक्षवेधी ठरणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजात दुरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. मान आणि मणक्याच्या व्याधीमुळे १० नोव्हेंबरला एच एन रिलायन्स रुग्णालय ते उपचार्थ दाखल झाले. तब्बल 22 दिवसांच्या उपचारानंतर घरी परतले. मात्र प्रकृतीमुळे अधिवेशनात ते प्रत्यक्ष उपस्थित राहिले नव्हते. त्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळ बैठकांनाही ऑनलाइन उपस्थित राहण्यावर त्यांनी भर दिला होता. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या सत्ताधाऱ्यांच्या चहापान कार्यक्रमाला ते ऑनलाईन उपस्थित होते. मात्र अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या रामटेक बंगल्यावर सत्ताधाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री स्वतः उपस्थित राहिले. भाजपला सरकार पाडून दाखवाच, असे जाहीर आव्हान दिले आहे.