मुंबई - कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका अद्यापही टळलेला नाही. मात्र, राज्यात कोरोनाची तिसरी लाट आली, तर राज्य सरकार तिसऱ्या लाटेला थांबवण्यासाठी तयारीत असल्याचे मत, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले आहे. ते आपल्या शासकीय निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
आज मुख्यमंत्र्यांची बैठक
कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेची दाहकता अधिक होती. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा फटका राज्याला बसू नये, यासाठी राज्य सरकारने सर्वतोपरी तयारी केली असल्याचे, राजेश टोपे यांनी सांगितले. तिसऱ्या लाटेबाबतच्या तयारीच्या नियोजनासाठी आज मुख्यमंत्री यांनी बैठक बोलावली असून, या बैठकत राज्यात असलेल्या ऑक्सिजनचा साठा, डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांची संख्या आणि औषधांचा पुरेसा साठा यासंदर्भात आढावा घेतला जाणार आहे.
घाईगडबडीत अनर्थ होऊ नये
राज्यामध्ये आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची दाहकता कमी झाली आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने राज्य सरकार निर्बंध शिथिल करत आहे. मात्र, निर्बंध शिथिल करत असताना, घाई केल्यास अनर्थ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकार प्रत्येक गोष्टीचा विचार केल्यानंतरच त्या भागातील निर्बंध शिथिल करण्यास प्राधान्य देते. निर्बंध शिथिल करण्याआधी टास्क फोर्स सोबत चर्चा केल्यानंतरच मुख्यमंत्री निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात निर्णय घेत असतात, अशी माहितीही टोपे यांनी यावेळी दिली आहे.
राज्यात डेल्टा प्लसचे 45 रुग्ण
राज्यात सध्या डेल्टा प्लसचे 45 रुग्ण असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. डेल्टा प्लस व्हेरियंटचे संक्रमण झपाट्याने होते. त्यामुळे याबाबत आरोग्य विभागाकडून योग्य ती काळजी घेतली जात आहे. दरम्यान, डेल्टा या कोरोनाच्या प्रकाराला रोखण्यासाठी आम्ही तत्पर आहोत असही टोपे यावेळी म्हणाले आहेत