मुंबई - मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष व मनसे सरचिटणीस आदित्य शिरोडकर यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश केला आहे. या प्रवेशानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची धुरा राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांच्याकडे दिली जाईल, अशी चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची सुरुवातीपासूनच आदित्य शिरोडकर यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी होती. आता हे पद रिक्त झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांचे नाव समोर आले आहे.
तरुणांना मनसेकडे वळवण्यासाठी अमित ठाकरेंचे नाव चर्चेत
राज ठाकरे हे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. राज यांच्या भेटीसाठी अमित ठाकरे आणि त्यांच्याबरोबर मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे नाशिकला पोहचले आहेत. अमित यांनी काही दिवसांपूर्वीच सक्रिय राजकारणात प्रवेश केला होता. त्यांच्याकडे नेतेपदही देण्यात आले आहे. तरुणांना पुन्हा मनसेकडे वळवण्यासाठी अमित ठाकरे यांच्याकडे विद्यार्थी सेनेची जबाबदारीत देण्याची शक्यता आहे. जर, अमित ठाकरे यांच्याकडे मनविसेची जबाबदारी आली, तर त्यांना संघटनेची नव्याने बांधणी करावी लागेल. आदित्य ठाकरे यांनीही आपली राजकीय वाटचाल युवा सेनेच्या माध्यमातून केली आहे. दरम्यान, आता अमित ठाकरे यांच्याकडे विद्यार्थी सेनेची धुरा सोपवली, तर आदित्य यांच्याच पावलावर पाऊल ते टाकतील असेही बोलले जात आहे.
अमित ठाकरे हे राज ठाकरे यांचे चिरंजीव
अमित हे मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. अमित हे एक उत्तम स्केचेसही काढतात. (२०१४)च्या विधानसभा निवडणुकीवेळी अमित ठाकरे यांनी काही रोड'शो' केले होते. मनसेचा प्रचारही त्यांनी त्यांच्या शैलीत केला होता. अमित ठाकरे हे बऱ्याचदा त्यांच्या खास लुकमुळेही चर्चेचा विषय ठरलेले आहेत. अमित ठाकरे उत्तम फुटबॉलही खेळतात. दरम्यान, अमित ठाकरे यांच्याकडे युवा सेनेची जबाबदारी सोपवली, तर युवा वर्ग नेमका कोणत्या ठाकरेंकडे जातो हे पाहणे आवश्यक ठरणार आहे.