मुंबई - पहिले लग्न लपवून दुसऱ्या महिलेला लग्नाचे आमिष दाखवून विवाहबाह्य संबंध ठेवणे म्हणजे बलात्कारच करण्यासारखे आहे, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याची याचिका फेटाळताना नोंदवले आहे. ( Extramarital Affair Amounts To Rape ) मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांनी एका बलात्काराच्या आरोपातील आरोपीच्या निर्दोष मुक्ततेसाठी केलेल्या अर्जावर निकाल देताना हे मत नोंदवले आहे.
पतीची निर्दोष मुक्तता करता येणार नाही - सिद्धार्थ बांठिया या आरोपीने महिलेला लग्नाचे खोटे आमेश दाखवून फसवणूक केल्या प्रकरणात 2013 मध्ये दाखल झालेल्या गुन्हामधून निर्दोष मुक्तता करण्यात यावी यासाठी पुण्यातील सत्र न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांनी महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे तथाकथित पतीची निर्दोष मुक्तता करता येणार नाही अशी टिप्पणी मुंबई उच्च न्यायालयाने केली आहे.
तर संमती दिली नसती - विवाहित असताना अभिनेत्रीशी दुसरं लग्न केले. त्यामुळे या लग्नाला मान्यता देता येऊ शकत नाही. आरोपीने जाणीवपूर्वक अभिनेत्रीचा पती असल्याचे नाटक केले व तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आरोपीच्या पहिल्या विवाहाबद्दल माहिती असती तर अभिनेत्रीने यासाठी संमती दिली नसती, असं निरीक्षण निकाल देताना न्यायालयाने नोंदवले आहे.
अभिनेत्रीच्या कॉमन मित्राने दोघांची भेट घालून दिली - पत्नी आणि दोन अपत्यं असताना अविवाहित असल्याचा दावा करत सिद्धार्थ बांठिया या व्यक्तीने घटस्फोटीत मराठी अभिनेत्रीशी लग्न केले होते. हा प्रकार उघड झाल्यानंतर अभिनेत्रीने बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. आता सिद्धार्थविरोधात न्यायालयात बलात्काराचा खटला चालणार आहे. न्यायालयाने त्याचा दुसऱ्या विवाह बेकायदेशीर असल्याचे म्हटलं आहे. 2008 मध्ये सिद्धार्थ आणि मराठी अभिनेत्रीच्या कॉमन मित्राने दोघांची भेट घालून दिली आपण अविवाहित असल्याचे सांगत सिद्धार्थने जून 2010 मध्ये अभिनेत्रीला लग्नासाठी गळ घातली एक महिन्यानंतर वर्सोवा येथे दोघांचा विवाह झाला. त्यानंतर दोन महिन्यांनी अभिनेत्रीला एका महिलेचा फोन आला. सिद्धार्थ माझा पती असून आम्हाला दोन मुलं असल्याचा दावा ती करत होती.
एका हॉटेलमध्ये लग्नाचा वाढदिवस साजरा केला - अभिनेत्रीने सिद्धार्थकडे याबाबत विचारणा केली तेव्हा त्याने होकार दर्शवला. पण पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला असल्याचे सांगत त्याने याबाबतची बनावट कागदपत्रंही दाखवली काही कालावधीनंतर सिद्धार्थने एका हॉटेलमध्ये लग्नाचा वाढदिवस साजरा केला, याचे फोटो वर्तमानपत्रात प्रकाशित झाले होते. ते फोटो पाहून संतापलेली पहिली पत्नी सिद्धार्थच्या घरी पोहोचली. तिथे तिने बराच गोंधळ घातला तेव्हा सिद्धार्थने घटस्फोटाची दाखवलेली कागदपत्रं बनावट असल्याचे मान्य केले.
सेशन कोर्टात याचिका दाखल - या सर्व प्रकारानंतर मराठी अभिनेत्रीने 2013 मध्ये सिद्धार्थविरुद्ध पुण्यातील दत्तावाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास करून आरोपपत्र दाखल केले. या विरोधात सिद्धार्थने निर्दोष मुक्ततेची मागणी करत पुण्यातील सेशन कोर्टात याचिका दाखल केली. 3 सप्टेंबर 2021 मध्ये सेशन कोर्टाने सुनावणीच्या वेळी आरोप हटवण्यास नकार देत, याचिका फेटाळली. त्यानंतर सिद्धार्थने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर आता न्यायालयाने निकाल दिला आहे.
हेही वाचा - Mohan Bhagwat : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतली सरसंघचालक मोहन भागवतांची भेट; काय झाली चर्चा?