मुंबई - राज्यातील रस्त्यावर होणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाकडून गेल्या काही वर्षांपासून अनेक प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नाला यश सुद्धा येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र, अपघातात मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढत असल्याची माहिती समोर येत आहे. राज्यात २०१७ वर्षापासून २०२१ पर्यंत रस्ते अपघातांची संख्या ३६ हजारांहून २९ हजारांपर्यंत घटलेली असताना मृत्यूच्या संख्येत मात्र १२ हजारांवरून १३ हजारांपर्यंत वाढ झालेली आहे. विशेष म्हणजे, राज्यात नाशिक ग्रामीण परिसरात सर्वाधिक अपघाती मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा - Mumbai Fire Brigade : अग्निसुरक्षेची माहिती लवकरच एका क्लिकवर
२०२१ मध्ये १३ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू -
वाहतूक नियमांचे उल्लंघन, चालकाचा निष्काळजीपणा यामुळे रस्ते अपघाताचे प्रमाण वाढले आहे. दरवर्षी देशात साधारण १.५० लाख वाहनचालकांचा मृत्यू रस्ते अपघातात होतो. राज्यात २०२१ साली २९ हजार ४९३ अपघात झाल्याची नोंद आहे. त्यामध्ये १३ हजार ५२८ नागरिकांचा जीव गेला, तर २३ हजार ७७ जखमी झाले. 2020 साली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असताना सुद्धा राज्यात २४ हजार ९७१ अपघात झाले. या अपघातांमध्ये ११ हजार ५६९ नागरिकांना प्राणांना मुकावे लागले, तर १९ हजार ९१४ लोक गंभीर जखमी झाले होते.
नाशिक ठरतोय मृत्यूचा मार्ग -
२०२० च्या तुलनेत २०२१ मध्ये रस्ते अपघात कमी झालेले असताना मृत्यूच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. २०२१ मध्ये १३ हजार ५२८ नागरिकांचा रस्ते अपघातात मृत्यू झालेला आहेत. या अपघातामध्ये सर्वाधिक अपघात एकट्या मुंबईत झाले आहेत. मुंबईत २ हजार २३० अपघात झाले, तर अपघातांमध्ये सर्वाधिक ८६२ मृत्यू नाशिक ग्रामीण भागात झालेले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, अपघातांमध्ये जखमींचे प्रमाणही मुंबईतच अधिक आहे. संपूर्ण राज्यात अपघातांमध्ये १ हजारांहून अधिक जखमी हे एकट्या मुंबईत झालेले असून, मुंबईतील अपघाती जखमींची संख्या १ हजार ९४२ इतकी होती.
किरकोळ अपघातामध्ये घट -
वाहतूक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, २०१८ साली राज्यात १२ हजार ०९८ प्राणांतिक अपघात झाले होते. त्यात २०२१ मध्ये १२ हजार ५४९ पर्यंत वाढ झाली आहे. या उलट याच कालावधीत राज्यातील किरकोळ अपघातांमध्ये ४ हजार ३८६ वरून २ हजार ०४१ पर्यंत घट झालेली आहे.
मृत्यूंजय दूत कार्यरत -
अपघातास आळा बसण्यासाठी केंद्र सरकाद्वारे दरवर्षी 'रस्ता सुरक्षा सप्ताह' आयोजित केला जातो. तरीही अपघाताची संख्या कमी होत नाही. वैद्यकीय मदत वेळेवर न मिळाल्याने हजारो लोकांचा जीव जात आहे. त्यासाठी राज्यात गोल्डन अवरमध्ये अपघातग्रस्तांना मदत मिळावी म्हणून 6 हजारांपेक्षा अधिक मृत्युंजय दूत कार्यरत आहेत. जखमींना त्यांनी वेळेवर वैद्यकीय मदत पोहचवली आहे. त्यामुळे, शेकडो जणांचे प्राण वाचल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. पण, तरीही रस्ते अपघातात मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.
अशी आहे आकडेवारी -
- २०२१ मध्ये राज्यात २९ हजार ४९३ रस्ते अपघातामध्ये १३ हजार ५२८ नागरिकांचा अपघाती मृत्यू तर, २३ हजार ७७ नागरिक जखमी झाले.
- २०२० मध्ये राज्यात २४ हजार ९७१ रस्ते अपघातामध्ये ११ हजार ५६९ नागरिकांचा अपघाती मृत्यू तर, १९ हजार ९१४ नागरिक जखमी झाले.
- २०१९ मध्ये राज्यात ३२ हजार ९२५ रस्ते अपघातामध्ये १२ हजार ७८८ नागरिकांचा अपघाती मृत्यू तर, २८ हजार ६२८ नागरिक जखमी झाले.
- २०१८ मध्ये राज्यात ३५ हजार ७१७ रस्ते अपघातामध्ये १३ हजार २६१ नागरिकांचा अपघाती मृत्यू तर, ३१ हजार ३६५ नागरिक जखमी झाले.
- २०१७ मध्ये राज्यात ३६ हजार ५६ रस्ते अपघातामध्ये १२ हजार ५११ नागरिकांचा अपघाती मृत्यू तर, ३२ हजार २४४ नागरिक जखमी झाले.
हेही वाचा - नवाब मलिक यांचा राजीनामा घेतल्याशिवाय भाजप गप्प बसणार नाही! - भाजप नेते चंद्रकांत पाटील