मुंबई - आई-वडिलांशी झालेल्या भांडणानंतर घरातून निघून गेलेल्या १९ वर्षांच्या तरुणीचा भांडुप पोलीस ठाण्यातील निर्भया पथकाने शोध घेऊन तिला पालकांच्या स्वाधीन केले. मुलीच्या पालकांनी कोणाविरुद्ध तक्रार केली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
पिंकी (नावात बदल) ही १९ वर्षांची तरुणी अंधेरीतील मरोळ पाईपलाईन परिसरात तिच्या कुटुंबियांसोबत राहते. बुधवारी रात्री तिचा आई - वडिलांसोबत वाद झाला. या वादानंतर ती रागाच्या भरात घरातून निघून गेली. बराच वेळ होऊनही घरी न परतल्याने तिच्या पालकांनी शोध सुरु केला होता. त्याच दिवशी रात्री दीड वाजता भांडुप पोलीस ठाण्याचे निर्भया पथकाचे पोलीस उपनिरीक्षक कांचन थोरात त्यांच्या पथकासह गस्त घालत होते. तेव्हा शबाना ही भांडुपच्या भट्टीपाडा मार्केट परिसरात फिरताना दिसली.
निर्भया पथकाची कामगिरी
पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेत तिची कसून चौकशी केली असता ती आई-वडिलांशी झालेल्या भांडणामुळे घर सोडून आल्याचे पोलिसांना कळले. पोलिसांनी तिच्याकडून घरचा पत्ता विचारून घेत तिच्या आई-वडिलांशी संपर्क साधून त्यांना भांडुप पोलीस ठाण्यात बोलाविले. याप्रकरणी या तरुणीसह तिच्या पालकांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली आहे. त्यांनी कोणावरही संशय व्यक्त केला नाही. त्यानंतर तिला तिच्या पालकांकडे सोपविण्यात आले होते. बेपत्ता झालेली मुलगी साडेतीन तासांत सापडल्याने तिच्या पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता.
हेही वाचा - ओबीसी आरक्षणाला हिरवा कंदील; सुधारित अध्यादेशावर राज्यपालांची सही