मुंबई - चित्रपटात काम देतो असे सांगून त्यांचा गैरफायदा घेऊ इच्छिणाऱ्या चार जणांना महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी चांगलाच धडा शिकवला आहे. एका मराठी अभिनेत्रीचा कास्टिंग काउच करण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र या अभिनेत्रीने दाखवल्या धाडसामुळे हे प्रकरण उघड झाले आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी या चौघांना रंगेहाथ पकडलं आणि चोप दिला. त्यानंतर त्यांनी या चौघांना पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे या आरोपींमध्ये एकजण हा शिवसेना चित्रपट सेनेचा पदाधिकारी असल्याचंही सांगण्यात येत आहे. यासंदर्भातली माहिती मनसे नेते अमेय खोपकर यांनी दिली आहे. सध्या पोलिसांनी या चौघांनाही ताब्यात घेतलं असून यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मनसेने केली आहे
काय आहे संपूर्ण प्रकरण -
एका मुलीला तिवारी आणि यादव नावाच्या दिग्दर्शकांनी चित्रपटांमध्ये काम देतो असं सांगितले. या दोघांसाठी कास्टींगचं काम करणाऱ्या दोन व्यक्तींनी या मुलीला तुला निर्मात्यांना खूष करावं लागेल असे सांगण्यात आले. त्यानंतर या मुलीला एक फोन आला त्यामध्ये तिला सांगितलं की तुला ठाण्यामधील एका हॉटेलमध्ये यायचं आहे. जिथे आम्हा दोघांबरोबरच आमचा एक मित्रही असेल. आमचा मित्र लखनऊवरुन येणार असून तुला रात्रभर त्या हॉटेलमध्ये आम्हा तिघांसोबत थांबावं लागेल असं या मुलीला सांगण्यात आलं. ही माहिती या मुलीने महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर या निर्मात्यांना रंगेहाथ पकडण्यासाठी जाळे टाकण्यात आले. व या मुलीसोबत मनसेचे कार्यकर्ते या ठिकाणी पोहचवून त्यांना निर्मात्यांना चोप दिला.
तिच्या या एका आवाजासाठी आम्ही इथे
आम्हाला प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर आम्ही ती माहिती खूप कमी लोकांना दिली. त्यांनी या लोकांचा मनसे स्टाइल समाचार घ्यायला सांगितला. ही अशी माणसं उत्तर प्रदेश, बिहारमधून येतात आणि आपल्या मुलींना खराब करण्यासाठी त्यांना नको नको त्या चित्रपटांमध्ये काम देण्याचं आमिष दाखवलं जातं. मात्र या मुलीची दाद दिली पाहिजे कारण तिने यांच्याविरोधात उभं राहण्याचा निर्णय घेतला. हे असे नराधम लोकांसमोर आले पाहिजेत. आज मी आवाज नाही उठवला तर हे लोक अशा किती महिलांवर आत्याचार करतील सांगता येत नाही. तिच्या या एका आवाजासाठी आम्ही इथे एकत्र येऊन या लोकांना चोप दिल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष पद्मनाभ राणे यांनी दिली आहे.