मुंबई - क्रूझवरील कारवाईनंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना सुरु झाला आहे. त्यातच एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी मुंबई पोलीस पाळत ठेवत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. पोलिसांना असे कोणतेही आदेश दिलेले नाहीत, असा खुलासा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केला. मात्र वानखेडे यांच्या आरोपांमुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे.
वानखेडेंवर पाळत नाही
क्रूझवर सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर एनसीबीच्या मुंबई पथकाने धाड टाकली होती. सुपरस्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यासह एकूण आठ जणांना ताब्यात घेतले होते. या सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीच्या या कारवाईवर आक्षेप घेतला होता. त्यांनी पत्रकार परिषद आयोजित करुन एनसीबीची कारवाई ही भाजप नेत्यांच्या सांगण्यावरुन झाल्याचा गंभीर आरोप करत काही फोटो आणि व्हिडिओ प्रसारमाध्यमासमोर सादर केले.
या प्रकरणावरून राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर ही कारवाई करणारे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी मुंबई पोलीस आपल्यावर पाळत ठेवत असल्याचा खळबळजनक आरोप केला असून तशी तक्रार दाखल केली आहे. यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज प्रसार माध्यमांसमोर खुलासा केला. ते म्हणाले की, पाळत ठेवण्याच्या कोणत्याही सूचना कुणाला दिल्या नाहीत, असे सांगत गृहमंत्र्यांनी वानखेडेंचे आरोप फेटाळून लावले. वानखेडे यांच्या आरोपांविषयी आपल्याला फार माहिती नाही, त्याची अतिरिक्त माहिती घेऊन त्यावर स्पष्टीकरण देईन, असेही वळसे पाटील म्हणाले.
गुन्हेगारी, महिला सुरक्षेसाठी बैठक
राज्यात गुन्हेगारी, बलात्काराच्या घटना वाढू लागल्या आहेत. विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरले आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री वळसे पाटील यांनी आज (मंगळवार) बैठक बोलावली आहे. राज्यातील सर्व पोलीस अधीक्षक आणि पोलीस आयुक्त उपस्थितीत राहणार आहेत. यामुळे गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि महिला सुरक्षा वाढवण्यासाठी काही महत्त्वपूर्ण सूचना राज्यातील सर्व पोलीस अधीक्षक आणि पोलीस आयुक्तांना दिल्या जाणार आहेत.
फोन टॅपिंग प्रकरणी समन्स
राज्याचे माजी पोलिस महासंचालक आणि सध्या केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) प्रमुख सुबोध जयस्वाल यांना पोलिसांनी समन्स बजावले आहेत. तत्कालीन गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या फोन टॅपिंग प्रकरणात सीबीआयचे प्रमुख सुबोध जयस्वाल यांना समन्स बजावण्यात आले आहेत. यापूर्वी ते पोलीस महासंचालक होते. त्यामुळे समन्स बजावण्यात आल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा : राज्यपालांच्या उपस्थितीत गडचिरोलीतून सीआरपीएफची सायकल रॅलीस प्रारंभ, रश्मी शुक्लांची होती उपस्थिती