मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वास्तव्यास असणाऱ्या परिसरात (वांद्रे पूर्व ते सांताक्रूझ) मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांचा आकडा घटला आहे. मागील काही दिवसांपासून येथील रुग्णांची संख्या कमालीची कमी झाली आहे. सध्या या परिसरातील रुग्णांचा डबलिंग रेट 79 दिवसांवर आला आहे. पालिकेच्या एच-पूर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना यश येत असल्याचे चित्र आहे. आज 'एच-पूर्व' विभागात केवळ 12 रुग्ण आढळले आहेत.
वांद्रे पूर्व विभागात बेहराम पाडा, भारत नगर, ज्ञानेश्वर नगर, वाकोला, गरीब नगर अशा झोपडपट्ट्यांचे भाग आहेत. या ठिकाणीएसआरएच्या इमारती देखील आहेत. त्यामुळे या भागांमध्ये रुग्ण सापडायला सुरुवात झाली. रुग्ण आढळण्यास सुरुवात झाल्यानंतर पालिकेच्या चिंतेत भर पडली. मात्र, एप्रिलपासून पालिकेने येथे स्क्रिनिंग, संशयित रुग्णांचा शोध, क्वारंटाइन, कंन्टेमेंट झोनमध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात आल्याने महिनाभरात रुग्ण कमी झाले आहेत. आता रुग्णांचा आकडा 15 ते 25 दरम्यान आला आहे. आज तर एच-पूर्व विभागात फक्त 12 रुग्ण आढळल्याचे 'एच-पूर्व'चे वार्ड अधिकारी अशोक खैरनार यांनी सांगितले.
काल या भागात 18 रुग्ण आढळले होते. तर गेल्या आठवड्याभरापासून येथील रुग्णांचा आकडा 20 ते 25 च्या आत रोखण्यात पालिकेला यश आले आहे. त्यामुळेच मुंबईत कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी हा विभाग पहिल्या क्रमांकावर आहे. यापुढे रुग्णांची संख्या याच पटीत कमी झाल्यास लवकरच हा विभाग कोरोनामुक्त होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.
आजवर या भागात 2 हजार 707 रुग्ण आढळले असून 2000 रुग्ण बरे झाले आहेत. तर 171 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी 109 जणांना अन्य आजार असल्याचे निष्पन्न झाले आहे. 171 पैकी 138 मृत्यू हे 50 वर्षांपुढील रुग्णांचे झाले आहेत.