मुंबई - कोरोनाची लागण होऊन मृत्युमुखी पडणाऱ्या डॉक्टरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशात आतापर्यंत 500 हुन अधिक डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. तर यातील 56 डॉक्टर हे महाराष्ट्रातील आहेत. मृत आणि कोरोनाग्रस्त डॉक्टरांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना राज्य सरकार मात्र डॉक्टरांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करत आहे. त्यात मृत डॉक्टरांना विम्याची रक्कमही देत नाही. यावर इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्रने नाराजी व्यक्त केली आहे.
खासगी डॉक्टरांची अवहेलना थांबवा, असे म्हणत विम्याचा आणि डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याची मागणी आयएमए महाराष्ट्रने केली आहे. तर हा प्रश्न निकाली निघाला नाही तर आयएमए महाराष्ट्रला कडक भूमिका घ्यावी लागेल असा इशाराही दिला आहे.
डॉ. अविनाश भोंडवे अध्यक्ष, आयएमए, महाराष्ट्र मागील सात महिन्यांपासून खासगी डॉक्टरही कोरोना योध्दा म्हणून काम करत आहेत. दरम्यान मृत सरकारी डॉक्टरांच्या कुटुंबाला 50 लाखांची मदत मिळत आहे. पण मृत खासगी डॉक्टरांच्या कुटुंबाला मात्र विमा नाकारला जात आहे. आयएमएकडून जे काही अर्ज विम्यासाठी पाठवले जात आहेत, ते सर्व नाकारले जात आहेत. त्यामुळे आयएमए महाराष्ट्र नाराज आहे. मुळात राज्य सरकारने खासगी डॉक्टरांना विमा लागू झाल्याचे जाहीर केले. डॉक्टरांशी झालेल्या बैठकीत याची घोषणा करण्यात आली. मात्र आता हेच सरकार आम्हाला विमा नाकारत आहे. ही कोरोना योध्याची अवहेलना आहे, अशी प्रतिक्रिया आयएमए महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली आहे. खासगी डॉक्टर कोरोना काळात रुग्णसेवा देत आहेत. ही सेवा देताना त्यांना कोरोनाची लागण होत आहे. यात काही डॉक्टर शहीद होत आहेत. एकूणच सरकारी डॉक्टरांप्रमाणेच खासगी डॉक्टरही प्राणाची बाजी लावत आहेत. मग आम्हाला वेगळी वागणूक का? असा सवालही भोंडवे यांनी केला आहे. दरम्यान सरकार विमा देत नसले तरी आता आयएमएचे डॉक्टर मृत डॉक्टरांच्या कुटूंबाला आधार देण्यासाठी पुढे आले आहेत. त्यानुसार ते आता विशेष फंड जमा करत या कुटूंबाला शक्य तेवढी मदत करणार असल्याची माहिती आयएमए महाराष्ट्रचे सचिव डॉ. पंकज बंदरकर यांनी दिली आहे.