नाशिक - गंगापुर धरण ८० टक्के भरले असून गुरुवारी यंदाच्या हंगामातील धरणातून पहिला विसर्ग करण्यात आला आहे. सकाळी 500 क्यूसेस पाणी सोडण्यात आले. दुपारनंतर विसर्गाचा वेग वाढवून 3 हजार क्यूसेक इतका करण्यात आला. दरम्यान, विसर्गामुळे गोदामाई दुथडी भरुन वाहत होती. पाण्याची पातळी वाढल्याने, गोदाकाठच्या छोट्या मंदिरांना जलसमाधी मिळाली. तर, अनेक मंदिरांमध्ये जलाभिषेक झाला आहे.
नदी काठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा
मागील दोन आठवड्यांपासून त्र्यंबकेश्वर व गंगापुर धरणाचे पाणलोट क्षेत्र असलेल्या अंबोली घाट परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे नाशिककरांची तहान भागविणार्या गंगापूर धरणाच्या जलसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. पंधरा दिवसांपुर्वी गंगापुर धरणात अवघा ३३ टक्के जलसाठा होता. त्यानंतर जोरदार आषाढ सरी कोसळल्या व गंगापूर धरणाचा जलसाठा ८० टक्क्यांवर पोहचला. धरण पाणलोट क्षेत्रात संततधार सुरु असल्याने, प्रशासनाने धरणातून विसर्गाचा निर्णय घेतला. गुरुवारी गंगापूर धरणातून सकाळी पाचशे क्यूसेक विसर्ग करण्यात आला. हळूहळू विसर्ग वाढवत दुपारपर्यंत तो तीन हजार क्यूसेक इतका वाढविण्यात आला.
विसर्गामुळे गोदामाई दुथडी भरुन वाहत होती. सर्व सांडवे पाण्याखाली गेले होते. दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्याच्यावर पाणी लागले होते. येथे पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, पावसाची संततधार सुरु राहिल्यास विसर्ग वाढवण्याची शक्यता असून, नदी काठच्या रहिवाशी व दुकानदार, व्यावसायिक यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मंदिराना जलाभिषेक
विसर्गाचा वेग वाढविण्यात आल्याने गोदामाई खळखळून वाहत होती. नदी पात्राच्या दोन्ही बाजुची अनेक छोटी मंदिरे पाण्यात गेली. तर, बाणेश्वर, गंगा गोदावरी मंदिर व इतर मंदिराना गोदेच्या पाण्याने जलाभिषेक घातला. दरम्यान, नाशिककरांची पावले आता गंगेकडे वळू लागले आहेत. पंधरा दिवसांपुर्वी गोदेचे पात्र कोरडेठाक पडले होते. मात्र, विसर्गामुळे गोदेला जणू पुर आल्याचे, चित्र होते. त्यामुळे हा पूर पहायला नाशिककरांची पावले गंगेकडे वळत होती. होळकर पुलावरुन दुथडी भरलेले गोदापात्र पाहण्यासाठी गर्दी झाली होती. धरणातील विसर्ग हा सकाळी १० - ५०० क्यूसेक इतका होता. तो दुपारी १२ - १००० क्यूसेक, सदुपारी २ - २००० क्यूसेक, दुपारी ४ - ३००० क्यूसेक इतका होता.