मुंबई - कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासना (एफडीए)ने राज्यात रेमडेसीवीर, इतर औषधे, ऑक्सिजन, मास्क आणि सॅनिटायझर्सच्या उपलब्धतेचा विभागानिहाय आढावा आज घेतला. त्यानुसार विदर्भासह राज्यात औषधे, मास्क, सॅनिटायझर्सचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचा दावा एफडीएने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.
विदर्भासाठी दोन लाख रेमडेसीवीर इंजेक्शन उपलब्ध
कोरोनावर अद्याप औषध आलेले नाही. मात्र असे असले तरी इतर आजारावरील जुनी रेमडेसिविर, फेबीफिविर, टॉसलीझुमाबसारखी औषधे उपयुक्त ठरत आहेत. त्यामुळे या औषधांचा वापर गंभीर रुग्णांसाठी केला जात आहे. सुरुवातीला म्हणजे जून-जुलैमध्ये या सर्व औषधांचा मोठा तुटवडा राज्यात होता. पण त्यानंतर या औषधांची निर्मिती वाढवण्यात आली. त्यामुळे आता पुरेसा साठा उपलब्ध आहे. या आढावा बैठकीनुसार राज्यातील कोविड सेंटरमध्ये 51425 रेमडेसिविर इंजेक्शन, 20 लाख 15 हजार 381 फेवीपिवीर टॅब्लेटचा साठा उपलब्ध आहे. तर ज्या विदर्भात आज रुग्णसंख्या वाढती आहे, त्या विदर्भासाठी नागपूरमध्ये मायलन फार्मा कंपनीच्या डेपोत 1 लाख 98 हजार रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध आहेत. त्यामुळे अमरावती, यवतमाळ, अकोला या हॉटस्पॉटमध्ये कुठेही औषधांची कमतरता भासणार नाही, असा दावा एफडीएने केला आहे.
1287 टन ऑक्सिजन उपलब्ध
कोरोना रुग्ण वाढले आहेत. मात्र गंभीर रुग्णांमध्ये तशी वाढ झालेली नाही. त्यामुळे ऑक्सिजनच्या मागणीत अजूनपर्यंत तरी मोठी वाढ झालेली नसल्याचे एफडीएने सांगितले आहे. तर आज संपूर्ण राज्यात अंदाजे दिवसाला 513 टन ऑक्सिजनची गरज असताना आपल्याकडे दिवसाला 1287 टन ऑक्सिजन उपलब्ध होत असून या साठा बराच मोठा आहे. त्यामुळे ऑक्सिजन कोणत्याही परिस्थितीत कमी पडणार नाही, असेही एफडीएने स्पष्ट केले आहे. राज्यात 30 उत्पादक आणि 88 रिफिलर/वितरक 1287 टन ऑक्सिजन निर्माण करत आहेत. तर अजून आजच्या घडीला 2489 टन ऑक्सिजनचा साठा शिल्लक आहे. तर 6227 टन साठा मृत झाला आहे. त्यामुळे ऑक्सिजनची टंचाई भासणार नाही. दरम्यान सॅनिटायझर्स आणि सर्व प्रकारच्या सर्जीकल मास्कचा साठा ही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्याचा एफडीएने केला आहे.