मुंबई - ज्ञानदेव वानखेडे (Dnyandev Wankhede petition in Mumbai High court) यांच्या नवाब मलिक यांच्या विरोधातील याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय 22 नोव्हेंबरपर्यंत राखीव ठेवला आहे. 22 नोव्हेंबरला मुंबई उच्च न्यायालय (Mumbai High court) अंतिम निर्णय देणार आहे. दोन्ही बाजूने न्यायालयात आज कागदपत्र सादर करण्यात आले. ज्ञानदेव वानखेडे हे एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (NCB officer Sameer Wankhede) यांचे वडील आहेत.
अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी अब्रू नुकसानीचा दावा ठोकला होता. मलिक यांनी समीर वानखेडे आणि त्यांच्या वडिलांविरोधात आरोप केले आहेत. ट्विट करत वानखेडे हे मुस्लिम असल्याचा दावा नवाब मलिकांनी केला आहे. तसेच वानखेडेंच्या जातप्रमाणपत्रावर मलिकांनी प्रश्न निर्माण केला आहे. यामुळे नवाब मलिकांविरोधात ज्ञानदेव वानखेडे यांनी मानहानीचा दावा ठोकला आहे. वानखेडेंच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी होणार होती. परंतु न्यायालयाने आता सुनावणी पुढे ढकलली आहे.
अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab MaliK) यांनी आपल्या म्हणण्याच्या आणि ट्विटच्या समर्थनार्थ दिलेले समीर वानखेडे यांचे सेंट जोसेफ शाळेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्राची प्रत उच्च न्यायालयात सादर केली. तसेच, ज्ञानदेव वानखेडे यांनी स्वतःचे जात प्रमाणपत्रही कोर्टापुढे सादर केले आहे. या बरोबरच काल, बुधवारी मुंबई महापालिकेकडून मुलगा समीर वानखेडे याच्या मिळालेल्या जन्मदाखल्याची प्रतदेखील उच्च न्यायालयात न्यायमूर्ती माधव जामदार यांच्यासमोर सादर करण्यात आली. न्यायमूर्तींनी ते न्यायालयाच्या रेकॉर्डवर घेऊन पुन्हा आदेश राखून ठेवत असल्याचे स्पष्ट केले. तसेच हा अंतरिम आदेश २२ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ५.३० वाजता जाहीर करणार असल्याचे न्यायालयाने म्हटल्याची माहिती ज्ञानदेव वानखेडे यांचे वकील अरशद शेख यांनी माध्यमांना सांगितले.
काय आहेत नवाब मलिक यांचे आरोप?
अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट करत आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून समीर वानखेडे यांच्याविरोधात अनेक आरोप केले आहेत. वानखेडेंचे जातप्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप केला आहे. समीर वानखेडे यांनी बनावट कागदपत्र सादर करुन शासकीय सेवेत नोकरीला लागले असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच ते जन्मापासून मुस्लिम असून त्यांच्या प्रमाणपत्रावर समीर दाऊद वानखेडे असे नाव असल्याचे नवाब मलिक म्हणाले.
नवाब मलिक म्हणाले की, वानखेडेंनी जन्म झाल्यावर जे सर्टिफिकेट होते त्यात बोगसपणा करुन नवीन तयार केले आणि आता दाखवत आहेत. कितीही काही केले तरी बोगस सर्टिफिकेटच्या आधारावर नोकरी घेतली ती नोकरी निश्चित रुपाने जाणार आहे असे नवाब मलिक म्हणाले. मुंबई महानगरपालिकेत सगळी माहिती आहे. माझ्याकडे त्यांच्या शाळेचा दाखला, शाळेत दाखल होण्याचा फॉर्म असे अनेक कागदपत्रे असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.
समीर वानखेडेंची आयोगाकडे धाव
नवाब मलिक यांनी समीर वानखेडे आणि त्यांच्या वडिलांच्या जातीच्या प्रमाणपत्रावर संशय व्यक्त केल्यानंतर समीर वानखेडे दिल्लीत गेले होते. यावेळी त्यांनी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्षांची भेट घेतली होती. आयोगाच्या अध्यक्षांना सर्व कागदपत्रे सादरही केली होती. आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कागदपत्रांची छाननी सुरू केली आहे. मात्र वानखेडेंवर आरोपांवर आरोप होत आहेत.
हेही वाचा-Sameer Wankhede प्रकरणात नवा ट्विस्ट; समीर ज्ञानदेव वानखेडे उल्लेख असलेली कागदपत्रे सादर
नवाब मलिक यांचा आरोपांचा धडाका
नवाब मलिक यांनी आज (गुरुवारी) समीर वानखेडे यांच्यावर तीन गंभीर आरोप केले होते. समीर वानखेडे यांनी एका आयपीएस अधिकाऱ्याच्या मुलाला खोट्या गुन्ह्यात अडकले. आधीच्या पत्नीच्या नातेवाईकालाही खोट्या गुन्ह्यात अडकवले आणि शाळा सोडल्याचे बनावट दाखले सादर केल्याचा गंभीर आरोप मलिक यांनी केला.
जाती-धर्मावरुन वाद-
नवाब मलिक यांनी वानखेडे यांची जात आणि कथित धर्मांतरावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. मी अनुसूचित जमाती वर्गातील आहे. माझा मुलगाही अनुसूचित जमाती वर्गातील आहे. मी मुस्लिम महिलेशी लग्न केले. पण मुस्लिम धर्माशी आमचा काहीच संबंध नाही, असं ज्ञानदेव वानखेडे यांनी स्पष्ट केले होते. दुसरीकडे, समीर वानखेडे मुस्लिम असल्यानेच त्यांच्याशी माझ्या मुलीने लग्न केल्याचा दावा समीर वानखेडे यांच्या पहिल्या बायकोच्या वडिलांनी केला आहे.
काय आहे मागणी?
नवाब मलिक यांनी ट्विटरवरुन एकामागून एक गौप्यस्फोट करण्याचा धडाका सुरुच ठेवला आहे. समीर वानखेडे आणि त्यांच्या वडिलांच्या जात प्रमाणपत्रावर त्यांनी संशय व्यक्त केला होता. या प्रकरणी ज्ञानदेव वानखेडे यांनी बॉम्बे हायकोर्टात धाव घेत अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता. प्रसारमाध्यम, सोशल मीडियामध्ये आपल्या कुटुंबियांबद्दल प्रसारित होणाऱ्या वृत्तांवर बंदी यावी, यासाठी ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. नवाब मलिक यांच्याविरोधात त्यांनी सव्वा कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे.
प्रकरणात काय नवीन वळण मिळण्याची शक्यता -
दरम्यान, तत्पूर्वी काही अतिरिक्त कागदपत्रे सादर करण्यासाठी नवाब मलिक यांनी परवानगी मागितली तर समीर वानखेडे यांना मुंबई महापालिकेने दिलेल्या जन्मदाखल्याची प्रत शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र व अन्य कागदपत्रे नवाब मलिक यांना सादर करायची असल्याची माहिती आहे. दोन्ही पक्षकारांच्या युक्तिवाद ऐकल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai Highcourt) आपला निकाल राखून ठेवला होता. मात्र, काल नवाब मलिक यांच्याकडून समीर वानखेडे यांचा जन्माचा दाखला न्यायालयात देण्यात आल्यानंतर आता या प्रकरणात काय नवीन वळण मिळते, हे पाहावे लागणार आहे. आज न्यायालय आपला यासंदर्भात निकाल देणार आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष याकडे लागले आहे.
अमली पदार्थ विरोधी पथक (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे (NCB Zonal Director Sameer Wankhede) यांच्या शाळेच्या दाखल्यात त्यांचा धर्म मुस्लिम असल्याचा उल्लेख आहे. तसेच या दाखल्यामध्ये समीर वानखेडे यांचे पूर्ण नाव समीर दाऊद वानखडे आहे. त्यांचा शाळेचा दाखला आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये (Bombay High Court) सादर केला आहे. समीर वानखेडे यांनी खोट्या कागदपत्राद्वारे आपण मुस्लिम असल्याचे लपवल्याचा पुनरुच्चार राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी पत्रकार परिषदेतून केला.
हेही वाचा-ज्ञानदेव वानखेडे आणि नवाब मलिक दोघांनाही अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
समीर वानखेडेंनी सादर केलेला दाखला खोटा
सध्या समीर वानखेडे यांच्याकडून आपल्या जातीचा तसेच जन्माचा दाखला दाखवला जात आहे. तो खोटा असून, 1993 नंतर आपला धर्म लपवण्यासाठी वानखेडे कुटुंबियांकडून खरे दस्तावेज लपवले जात आहे. मात्र त्यांचे सर्व खरे दस्तावेज न्यायालयासमोर ठेवले आहे, असे नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.