मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा सामना मुखपत्रच्या संपादकीय पदी विराजमान झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व बंडखोर आमदारांवर अग्रलेखातून टीकास्त्र सोडले आहे. त्याचप्रमाणे सुप्रीम कोर्टात नुकत्याच झालेल्या सुनावणीनंतर शिवसेना नेतृत्वाच्या आत्मविश्वासात वाढ झाल्याचं दिसत असून त्याचं प्रतिबंब आजच्या सामना अग्रलेखात उमटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार आणि खासदारांसह केलेल्या बंडानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या राजकीय अस्तित्वाबद्दल सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. शिवसेनेत याआधीही अनेक दिग्गज नेत्यांनी बंड केलं होतं. मात्र, यावेळी शिंदे यांनी बंड करत थेट शिवसेना पक्षावरच दावा सांगितला आहे. त्यामुळे हे बंड ऐतिहासिक ठरलं असून शिवसेना कोणाची, ही लढाई आता कायदेशीर पातळीवर लढली जात आहे. शिवसेना नेत्यांकडून बंडखोर आमदारांवर टीका केली जात असली, तरी एकनाथ शिंदे यांचं नाव घेत टोकदार शब्दांत टीका करणं टाळलं जात होतं. मात्र, पक्षाचं मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातून एकनाथ शिंदे यांच्यावर आतापर्यंतची सर्वात घणाघाती टीका करण्यात आली आहे.
औटघटकेच्या सरकारसाठी 'स्ट्रेचर' व अॅम्ब्युलन्स तयार - 'एकनाथ शिंदे यांना आता मळमळत आहे. गरगरत आहे. क्रांतीच्या वल्गना केल्या व आता भीतीपोटी वांती सुरू झाली. शिंद्यांची प्रकृती बिघडली. त्यांच्या चाळीस समर्थकांसाठी हा शुभशकुन नाही. औटघटकेच्या सरकारसाठी 'स्ट्रेचर' व अॅम्ब्युलन्स तयार ठेवायला हवी. शिंद्यांनी लवकर बरे व्हावे, त्यांना बरेच काही पाहायचे आहे. ईश्वर त्यांना ते सर्व पाहण्याचे बळ देवो,' अशा शब्दांत शिवसेनेनं शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या बंडखोर आमदारांविरोधात सामना अग्रलेखातून हल्लाबोल केला आहे.
अलिबाबा आणि चाळीस चोर - बंडखोर आमदारांवर शिवसेना नेत्यांकडून सातत्याने टीका केली जात आहे. मात्र, ही टीका करताना या आमदारांसाठी परतीचे दरवाजे उघडे असल्याचंही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडून सांगितलं जात होतं. मात्र, आता हे सरकार फार काळ टिकणार नसल्याचं सांगत शिवसेनेनं बंडखोरांवर खरमरीत शब्दांत टीका केली आहे.
मुख्यमंत्री आजारी पडावेत, चाळीस चोरांसाठी चिंताजनक ? - गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्राची राजकीय प्रकृती बिघडलीच होती, पण ज्यांच्या फुटीरतेच्या किंवा विश्वासघाताच्या 'डायरिया'मुळे राज्याची प्रकृती खालावली ते मुख्यमंत्री शिंदेही आजारी पडल्याचे वृत्त अलिबाबा आणि चाळीस चोरांसाठी चिंताजनक आहे. मनुष्यप्राणी व त्याचे शरीर म्हणजे एक यंत्र आहे. त्यात अधून- मधून बिघाड होणारच, पण शिंदे हे किमान २० ते २२ तास न झोपता काम करतात. त्यांच्या कामाचा उत्साह व उरक दांडगा आहे. कोणताही व्हायरस त्यांच्या अवती- भवती फिरत नाही. तरीही मुख्यमंत्री शिंदे आजारी पडावेत, हे त्या 'चाळीस' जणांसाठी चिंताजनक आहे. शिंदे यांना नक्की कोणता आजार जडला आहे. हे त्यांनाच माहीत, पण सर्वोच्च न्यायालयात सध्या ज्या घडामोडी सुरू आहेत. त्यामुळे अनेकांना विविध व्याधींनी ग्रासले आहे,' असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.
न्यायालयात सत्य व इमानदारीचाच विजय होईल - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे लवकरच राज्यव्यापी दौरा करणार असून उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्यानंतर राज्यातील संपूर्ण वातावरणच बदलून जाईल, असा विश्वास शिवसेनेकडून व्यक्त करण्यात आला आहे. 'शिवसैनिक, शिवप्रेमी जनता आमच्या मागे ठामपणे उभी आहे. उद्धव ठाकरे यांचा राज्यव्यापी दौरा आता सुरू होईल व राज्याचा माहोल बदलण्याची क्रिया सुरू होईल. त्यानंतरचा उडालेला धुरळा पाहून आजचा आजार जास्तच बळावेल व कितीही जादूटोणा केला तरी शिवसेनेची लाट कोणाला रोखता येणार नाही. पुन्हा ८ ऑगस्टला न्यायालयात सत्य व इमानदारीचाच विजय होईल,' असंही सामना अग्रलेखात म्हटलं आहे.
हेही वाचा - Aurangabad flood : दुदैवी....! पुरात वाहून गेल्याने एकाचा मृत्यू, परिसरात शोककळा