मुंबई - महाविकास आघाडी सरकारच्या ( MVA Government ) वतीने 'विकासाची पंचसूत्री' सह मांडलेला अर्थसंकल्प ( Maharashtra Budget 2022 ) महिला वर्गाला विकासाच्या विशेष संधी आणि सामाजिक न्यायातून सामाजिक विकासाला चालना देणारा आहे. राज्यातील सर्व घटकासाठी समावेशक तरतुदी करणारा असून, आम्ही त्याचे स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया आज विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिली ( Neelam Gorhe Welcomes Maharashtra Budget 2022 ) आहे.
भरीव तरतूद, ठोस काम
आज राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळ अधिवेशनात मांडण्यात आला. विधानसभेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर विधान परिषदेत गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी अर्थसंकल्प मांडला. सन २०२२ हे "शेतकरी - महिला सन्मान वर्ष" म्हणून घोषित करण्यात आले आहे याचा मला विशेष आनंद आहे. भारतातील पहिल्या महिला डॉक्टर डॉ. आनंदीबाई जोशी यांचा विशेष उल्लेख करून त्यांच्या कार्यास यावेळी अभिवादन राज्य सरकारच्या वतीने करण्यात आले आहे. शाश्वत विकास उद्दिष्टे गाठण्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी भरीव तरतूद केल्याने याबाबत ठोस काम होऊ शकेल.
महिला उद्योजकांना संधी
पुण्याजवळ 'इंद्रायणी मेडिसीटी' नावाने देशातील पहिली वैद्यकीय वसाहत सुरु होणार असल्याने वैद्यकीय उपचार आणि सुविधा सहज उपलब्ध होतील. स्त्रियांसाठी विशेष महिला रुग्णालये सुरु होणार असल्याने जिल्हा स्तरावर महिलांच्या उपचाराला प्राधान्य आणि सुलभता प्राप्त होणार आहे. महिला उद्योजकांच्या विकासाच्या मागणीला अतिशय स्तुत्य पद्धतीने न्याय देण्यात आला असून, 'पंडिता रमाबाई महिला विकास योजना' सुरु करून महिला उद्योजकांना संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी महिला आर्थिक विकास मंडळाला विशेष निधीची घोषणा झाली आहे, ही अत्यंत समाधानाची बाब असून, राज्य सरकारने सुरू केलेल्या शिवभोजन थाळीमुळे राज्यातील हजारो नागरिकांना भोजन उपलब्ध होत आहे, असे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.
पर्यटनास मिळणार चालना
कोविडमुळे बाधित आणि निधन झालेल्या कुटुंबाना योग्य ती आर्थिक मदत देण्यात आलेली आहे. त्यामुळे या कुटुंबाना काही प्रमाणात दिलासा मिळू शकला आहे. राज्यातील किल्ल्यांच्या संवर्धनासाठी आणि पर्यटनासाठी अनेक योजना जाहीर करून निधी उपलब्ध होणार आहे. पर्यटनासाठी अनेक नवनवीन उपक्रम हाती घेण्यात आल्याने पर्यटनास चालना मिळणार आहे. अष्टविनायक मंदिरे, पंढरपूर देवस्थान, पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असलेली मंदिरे आणि ठिकाणे यांचा विकास यासाठी भरीव तरतूद केली आहे. पुणे जिल्ह्याच्या हद्दीत 'बिबट्या सफारी क्षेत्र' सुरु होत असल्याने आता पर्यटकांचा उत्साह वाढणार आहे. मराठी भाषा भवन आणि मराठी भाषा संशोधन उपकेंद्र सुरु होत असल्याने मराठी भाषेला अभिजात दर्जा आणि मराठीचा सन्मान वाढणार हे नक्की आहे. प्रत्येक जिल्ह्यात एक 'पुस्तकांचे गाव' निर्माण झाल्याने साहित्यप्रेमीना पर्वणी मिळणार आहे.
संतांच्या विचारांचा वारसा होणार जतन
राज्य लोकसेवा आयोगासाठी नवीन प्रशासकीय इमारत, नवी मुंबईमध्ये 'महाराष्ट्र भवन' पुण्यातील फुले वाड्यासाठी निधी, वेल्हे तालुक्यातील राजगडाजवळ सईबाई महाराजांचे स्मारक, सुदुंबरे येथे संत संताजी महाराज जगनाडे यांच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी निधी अशा अनेक समाधानकारक बाबी या अर्थ संकल्पात आहेत.मनुष्यबळ विकासामध्ये गडचिरोली आणि इतर आदिवासी भागामध्ये तरुणांना व्यवसायासाठी विशेष सहाय्य देण्यात येणार आहे. राज्यातील थोर समाजसुधारक आणि संतांच्या नावाने अध्यासन सुरु करण्यात येणार असल्याने त्यांच्या विचारांचा वसा आणि वारसा जतन केला जाईल.
समुद्री वाहतूक
इतर मागास वर्गासाठी नवीन आयोगाची स्थापना करण्यात येणार असल्याने त्यांच्या विकासाला दिशा मिळू शकणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात महिला बाल भवन सुरु केल्याने विविध कार्यक्रम हाती घेण्यास मदत होईल. मुंबई शहराला समुद्री मार्गाने वाहतूक सुरु झाल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील ताण कमी होणार आहे. या सर्व तरतुदींचा राज्यातील महिला, बालके, उद्योजक, नोकरदार, विद्यार्थी आणि सर्वच क्षेत्रांना फायदा होईल. यामुळे राज्य सरकारचे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अभिनंदन केले आहे.