मुंबई - मुंबईतील वाढती वाहतूक कोंडी फोडण्यासाठी कल्पकतेने, नाविन्यपूर्ण कामे केली जातील. वाहतूक व्यवस्था यामुळे सुरळीत होईलच, शिवाय नागरी विकासकामांवर भर देऊन नागरिकांना सुविधा निर्माण केल्या जातील, अशी ग्वाही पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( Aaditya Thackeray Minister of Tourism, Maharashtra ) यांनी दिली.
एमएमआरडीएमार्फत उड्डाणपुलांच्या खाली आणि वाहतूक बेटावर सुशोभिकरणाचे हे काम करण्यात आले आहे. सुशोभिकरणाच्या या कामांमुळे अतिशय व्यस्त असणाऱ्या कलानगर जंक्शनवर वाहतूक सुरळीत होऊन नागरिकांना सुविधायुक्त अतिरिक्त जागा वापरण्यास मिळणार आहे.
कलानगर जंक्शनचे क्षेत्रफळ सुमारे ८६९० चौरस मीटर आहे. कलानगर जंक्शनवर मोठ्या संख्येने वाहतूक सुरू असते. त्यामुळे पादचाऱ्यांसाठीही ते धोकादायक होते. यावर मात करण्यासाठी एमएमआरडीएमार्फत या परिसराचा विकास करण्यात आला आहे. यामुळे वांद्रे रेल्वेस्थानक आणि वांद्रे कुर्ला संकुलाकडे ( Bandra Kurla Complex ) जाणाऱ्या पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध होईल.
तीन बेटांचा विकास
कलानगर जंक्शन येथे उत्तर प्लाझा, दक्षिण प्लाझा आणि बेट प्लाझा अशा तीन बेटांचा विकास करण्यात आला आहे. यामध्ये लँडस्केपिंगसह आधुनिक पद्धतीचे पाण्याचे कारंजे, बसण्यासाठी ग्रेनाईटचे बाक, फूटपाथ आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीत असलेल्या झाडांभोवती सुशोभिकरणाद्वारे कुंपण घालण्यात आले आहे. याशिवाय विद्युत शिल्प, विविध प्रकारची फुलझाडे, मुलांना खेळण्यासाठी जागा या सुद्धा येथील आकर्षणाचे केंद्र ठरणार आहेत.
उड्डाणपुलांच्या खालील मोकळ्या जागेचा योग्य वापर होऊन नागरिकांसाठी सुविधा निर्माण केल्या आहेत. ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग व्यक्तींना देखील या जागेचा सहज आणि सुरक्षितपणे वापर करता येईल याची दक्षता घेतली आहे. पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी सुलभता व्हावी, यासाठी पुरेशी जागा उपलब्ध करून दिली आहे. त्यादृष्टीने बेटांवर पुरेशी विद्युत व्यवस्थाही उभारण्यात आली आहे.