मुंबई - जितेंद्र नवलाने यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लूक आऊट नोटीस काढली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. जितेंद्र नवलाने यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ईडी अधिकाऱ्यांसाठी व्यावसायिकांकडून वसुली करत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता
फरार झाल्याचा संशय - जितेंद्र नवलानी हा परदेशात फरार झाल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. त्यामुळेच नवलानी विरोधात लूक आऊट नोटीस काढण्यात आली आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी जितेंद्र नवलानी यांच्याविरोधात आरोप केले होते. त्यानंतर नवलानी विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.
काही महिन्यांपूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत ईडी अधिकाऱ्यांवर वसुली करत असल्याचे आरोप केले होते. यावेळी त्यांनी जितेंद्र नवलानीचा उल्लेख केला होता. नवलानी हा ईडी अधिकाऱ्यांसाठी वसूली करत असल्याचा आरोप त्यांनी केला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नवलानी विरोधात एफआयआर दाखल केला आहे. याबाबतची माहिती नवलानीला याआधीच देण्यात आली. त्यानंतर नवलानीने भारतातून पळ काढला असल्याचा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
एसीबीचे आरोप - नवलानी विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 5 मे रोजी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील कलम 7 अ आणि 8 नुसार गुन्हा दाखल केला होता. नवलानी याने मुंबई आणि परिसरातील उद्योजक, व्यावसायिकांकडून 59 कोटी रुपयांची वसुली केल्याचा आरोप केला आहे. नवलानीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आल्यानंतर 24 तासातच लूक आऊट नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती ACB च्या एका अधिकाऱ्याने दिली. त्याआधी नवलानी याला जबाब नोंदवण्यासाठी आणि चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आले होते. त्याचा ठावठिकाणा नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
नवलानींचा मनी लाँड्रिंग गुन्ह्यातही थेट सहभाग असल्याचा गंभीर आरोप - शिवसेना भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी नवलानीचं नाव घेतलं होतं. संजय राऊत यांनी ईडीचे अधिकारी हे परमबीर सिंह यांचे निकटवर्तीय जितेंद्र नवलानींच्या माध्यमातून खंडणीचं रॅकेट चालवतात. तसेच नवलानींचा मनी लाँड्रिंग गुन्ह्यातही थेट सहभाग असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्याची दखल घेत एसआयटीकडून याबाबत चौकशी सुरू करण्यात आली.