ठाणे - मुंब्रा म्हटले की बकाल अवस्था, ठिकठिकाणी फेरीवाल्यांचे बस्तान आणि अनधिकृत बांधकामांचे फुटलेले पेव. अशी काहीशी परिस्थिती २५ ते ३० वर्षांपासून मुंब्र्यात कायम होती. मात्र, ठाणे महापालिका सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या प्रशासकीय कौशल्यामुळे ही परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
आहेर यांच्यामुळे मुंब्र्याचे रस्ते प्रशस्त झाले आहेत. फेरीवाल्यांना बसण्यासाठी हक्काचे मार्केट मिळाले असल्याने रस्तेदेखील फेरीवाले मुक्त झाले आहेत. सोच बदलो मुंब्रा बदलेगा, ही काही महिन्यांपूर्वी दिलेली हाक आज खरी होताना दिसत आहे. मुंब्र्यात अनेक पालिका अधिकाऱ्यांनी यापूर्वी काम केले आहे. मात्र, म्हणावे तसे यश आले नव्हते. पण काम करण्याची जिद्द आणि उत्तम प्रशासकीय कौशल्याच्या जोरावर गेल्या वर्षभरात आहेर यांनी मुंब्र्यात मोठा बदल घडवला आहे.
आहेर यांच्यावर आतापर्यंत तीन वेळा समाजकंटकांनी हल्ला केला. मात्र, ते घाबरले नाहीत. त्यांनी आपले काम सुरूच ठेवले. त्यांनी आणि त्यांच्या टीमने जे काम केले आहे, ते सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी उत्तम उदाहरण आहे. केवळ प्रशासकीय बळाचा वापर न करता लोकप्रतिनिधी आणि नागरिकांमधील योग्य समन्वयाने नागरिकांची मानसिकता बदलणे सहज शक्य असल्याचे आहेर यांनी आपल्या कार्यपद्धतीने दाखवून दिले आहे.