मुंबई - कुर्ला पूर्व, शिवसृष्टी रोडवरील नाईक नगर सोसायटीमधील एका इमारतीचा काही भाग मध्यरात्री कोसळला ( The building of Naik Nagar Society collapsed ). ढिगाऱ्याखाली काही लोक असतील अशी शक्यता स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ३२ जणांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले आहे. त्यापैकी १८ जणांचा मृत्यू झाला आहे. ५ जण रुग्णालयात दाखल असून ९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणी ऑडिटरची चौकशी करून करावी करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत.
इमारतीचा भाग कोसळला - कुर्ला पूर्व, नाईक नगर सोसायटी, शिवसृष्टी रोड येथील कलेक्टर यांच्या जागेवरील एका खासगी इमारतीचा काही भाग काल सोमवारी रात्री ११.५० च्या सुमारास कोसळला. ही चार मजली इमारत आहे. इमारतीचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत ढिगाऱ्या खाली काही लोक अडकले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि एनडीआरएफ यांच्याकडून शोध मोहीम राबवली जात आहे. आतापर्यंत एकूण ३२ जणांना ढिगाऱ्याखालून काढण्यात बचाव पथकांना यश आले आहे. त्यापैकी १८ जणांचा मृत्यू झाला आहे.
राजवाडीत १७, सायनमध्ये १ मृत्यू - एकूण ३२ जणांना ढिगाऱ्याखालून काढण्यात आले. त्यापैकी राजावाडी रुग्णालयात ३० जणांना दाखल करण्यात आले होते. त्यापैकी १७ जणांचा मृत्यू झाला आहे. ४ जण अद्यापही उपचार घेत आहेत. तर ९ जणांवर उपचार करून सोडण्यात आले आहे. सायन रुग्णालयात २ जणांना दाखल करण्यात आले. त्यापैकी १ चा मृत्यू झाला असून १ उपचार घेत आहेत.

ऑडिटरवर कारवाई होणार - कुर्ला नेहरू नगर येथील नाईक नगर सोसायटीमधील ४ इमारती १९७३ मध्ये बांधण्यात आल्या होत्या. २०१६ मध्ये या इमारतींना धोकादायक जाहीर करण्यात आले. इमारतीचे लाईट आणि पाणी कापण्यात आले होते. मात्र सोसायटीने इमारत दुरुस्त करता येऊ शकते असा स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट सादर केला. यामुळे इमारतीला धोकादायक यादीमधून वगळण्यात आले होते. ही इमारत कोसळल्याने स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट देणाऱ्या ऑडिटरची चीनशी केली जाईल आणि त्यानंतर कारवाई केली जाईल अशी माहिती महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिली.

मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख - मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपये आणि जखमींवर मोफत उपचार करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच मंत्री सुभाष देसाई यांनी केली आहे. जेव्हा जेव्हा बीएमसी नोटीस देईल तेव्हा त्वरीत जागा रिकामी करा, जेणेकरून अशी घटना घडू नये असे मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

मृतांची नावे -
किशोर प्रजापती, २० वर्षे
सिकंदर राजभर, २१ वर्षे
अरविंद भारती, १९ वर्षे
अनुप राजभर, १८ वर्षे
अनिल यादव, २१ वर्षे
शामू प्रजापती, १८ वर्षे
अजिंक्य गायकवाड, ३४ वर्षे
अजय बासफोर, २८ वर्षे
लीलाबाई गायकवाड, ६० वर्षे
रमेश बडिया, ५० वर्षे
प्रल्हाद गायकवाड, ६५ वर्षे
गुड्डू बासफोर, २२ वर्षे
बिरजू माझी, २१ वर्षे
राहुल माझी, २४ वर्षे
पप्पू माझी, ३५ वर्षे
महेश माझी, ४० वर्षे
अनोळखी २ मृतदेह
हेही वाचा - Maharashtra Political Crisis : त्या आमदारांची नावे जाहीर करावे उगाच आकडे सांगू नयेत - शिंदेचे आव्हान