मुंबई - राज्यात कोरोना आटोक्यात येत असल्यामुळे राज्य सरकारने अनेक नियमांत शिथिलता आणली आहे. दोन दिवसांपूर्वी राज्यातील शाळा सुरू करण्यात आल्या. उद्यापासून राज्यातील मंदिरे खुली होत आहेत. अनेक महिन्यापासून मंदिरेही बंद होती, मात्र अखेर राज्य सरकारने मंदिरे खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या घटस्थापनेच्या मुहूर्तावर मंदिर प्रवेश सुरू होणार आहे. मात्र अटी-शर्तींसह हा प्रवेश मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर ती मंदिरात साफसफाई सुरू करण्यात आलेली आहे. अनेक मंदिरामध्ये आज सकाळपासूनच जोरदार तयारीला सुरुवात झाली आहे. वडाळा येथील प्रतिपंढरपूर वडाळा विठ्ठल मंदिरदेखील सकाळपासूनच मंदिर व्यवस्थापनाने साफसफाईला सुरुवात केली होती.
कोविड-19 संकटामुळे बंद असलेली राज्यभरातील मंदिरे, धार्मिक स्थळे उद्यापासून खुली करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. मात्र त्यासाठी कोविड-19 नियमांचे पालन करणे अनिवार्य असणार आहे. उद्या, गुरुवार, 7 ऑक्टोबर नवरात्रीचा पहिला दिवस आहे. या दिवसाच्या शुभ मुहूर्तावर मंदिरे भाविकांसाठी खुली होणार आहेत. उद्या मुंबईमधील सिद्धिविनायक आणि मुंबा देवीचे मंदिर भाविकांसाठी खुले होणार असून केवळ लसीकरण पूर्ण झालेल्यांनाच मंदिरात प्रवेश मिळणार आहे.
हे ही वाचा -#नवरात्रोत्सव2021 : 'महाराष्ट्राच्या नवदुर्गा' विशेष कार्यक्रम पाहा, फक्त 'ईटीव्ही भारत'वर
मंदिरात आम्ही एका वेळी 25 जणांना आत सोडणार आहोत मात्र नियमाचे पालन हे भाविकांना करावं लागणार आहे. भाविकांना मूर्तीला स्पर्श करता येणार नाही. प्रसाद दिला जाणार नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे ज्यांचे लसीकरणाचे दोन डोस झाले आहेत त्यांनाच मंदिरात येण्यास परवानगी असेल. येताना त्यांनी प्रमाणपत्र आणणे अनिवार्य असेल. जर 2 डोस नसेल तर आरटीपीसीआर करणे आवश्यक आहे. उद्याची संपूर्ण तयारी झाली आहे. असे उदय दिघे यांनी सांगितले.
ऑनलाइन बुकिंग करून येणाऱ्या भाविकांनाच मिळणार साईदर्शन, शनिदर्शनासाठी ऑफलाइन पद्धत
शिर्डी(अहमदनगर) - साईबाबा मंदिर येत्या सात ऑक्टोबरपासून भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात येत आहे. त्या दृष्टीने दिवसाला 15 हजार भाविकांना केवळ ऑनलाइन बुकींग करुनच साईदर्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला 10 हजार ऑनलाइन आणि पाच हजार ऑफलाइन पासेस देऊन दर्शन देणार असल्याचे साई संस्थानने जाहीर केले होते. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर काही तासाच्या आतच हा निर्णय बदलण्यात आला आहे. त्यानुसार आता 15 हजार भाविकांना केवळ ऑनलाइन बुकींग करुनच साईदर्शन घेता येणार आहे. तसेच साई संस्थानने प्रसादालय सुरू ठेवण्याचा निर्णयही आता रद्द करण्यात आला आहे.
शनिशिंगणापुरात थेट मिळणार दर्शन -
शनिशिंगणापुरातही दिवसभरात 20 हजार भाविक थेट जाऊन दर्शन घेऊ शकतील. शनि चौथाऱयावर जाण्यास आणि पूजा साहित्य नेण्यास शिंगणापुरात बंदी असल्याचे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले आहे.
घटस्थापनेच्या मुहूर्तावर अंबाबाई मंदिर भक्तांसाठी खुले.. ऑनलाइन बुकिंग असेल तरच मिळणार दर्शन
कोल्हापूर - येत्या 7 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरुवात होत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच धार्मिक स्थळे भक्तांसाठी खुली करण्यात येणार आहेत. कोल्हापुरातील अंबाबाईचे मंदिर सुद्धा त्याच दिवशी दर्शनासाठी खुले होणार आहे. त्या अनुषंगाने कोल्हापूर शहरात व अंबाबाई मंदिर परिसरात गर्दी होऊ नये. तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी योग्य नियोजन करण्यात आले असून भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी ऑनलाइन बुकिंग करूनच यावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
एका तासात अंदाजे 700 लोकांना दर्शनाची सुविधा -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिर परिसरात सर्व भाविकांना ऑनलाईन बुकींग करून दर्शन घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली गेली आहे. याद्वारे प्रत्येक तासाला अंदाजे 700 भाविकांना दर्शन मिळेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. आजपासून ऑनलाईन बुकिंग करण्यास सुरुवात होणार आहे. सुरुवातीला 7, 8 व 9 ऑक्टोबर 2021 अशा तीन दिवसाचे ऑनलाईन बुकिंग भाविकांना करता येणार आहे. त्यानंतर पुढील दिवसांचे बुकिंग हे करता येईल. ऑनलाईन बुकिंग साठी www.mahalakshmikolhapur.com ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.
NAVRATRA भाविकांना ७ ऑक्टोबरपासून वणीच्या सप्तशृंगीचे मिळणार दर्शन
नाशिक - महाराष्ट्रातील साडेतीन पीठांपैकी अर्धपीठ म्हणून वणीची सप्तशृंगी देवी ओळखली जाते. अठरा हातांच्या या मातेच्या दर्शनासाठी दरवर्षी देशभरातून लाखो भाविक येत असतात. तसेच नवरात्र उत्सव काळात पाच लाखांहून अधिक भाविक मातेच्या पायाशी नतमस्तक होत असतात. नाशिकपासून 60 किलोमीटर अंतरावर वणी येथील गडावर साडेतीन पीठांपैकी अर्धपीठ म्हणून ओळखली जाणारी सप्तशृंगी देवी विराजमान आहे. सह्याद्रीच्या पठारावर असलेले हे मंदिर पुरातन असून समुद्रसपाटीपासून 4,569 फूट उंचीवर आहे. मंदिरावर जाण्यासाठी नांदूर गावपासून पायी रस्ता आहे. तसेच पायऱ्या सोबत आधुनिक फेनिक्युलर ट्रॉलीच्या माध्यमातून काही मिनिटात भाविक थेट मंदिरापर्यंत पोहोचू शकतात. या भागात माकडांची मोठी वस्ती आहे. सप्तशृंगी गडाच्या बाजूला शिवतीर्थ शितकडा गणपती मंदिर गुरुदेव आश्रम सूर्यकुंड कालिका कुंड जलगुफा आदी ठिकाणे आहेत.