मुंबई - राज्यात तिसऱ्या टप्प्यात लसीकरण होत आहे. मात्र लसीकरण प्रक्रियेदरम्यान तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांना लस घेण्यास किंवा या प्रक्रियेत सहभागी होताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मुंबईमध्ये काल अनेक ठिकाणी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे लसीकरण केंद्रावर लस देण्यास विलंब झाला. हीच परिस्थिती आज जैसे थे आहे. मुंबईच्या सायन रुग्णालयात देखील कोविनच्या सर्व्हरमध्ये वारंवार होत असलेल्या तांत्रिक अडचणीमुळे लाभार्थ्यांना लस घेण्यास विलंब लागत आहे. त्यामुळे रुग्णालय परिसरात लाभार्थ्यांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या.
दुसऱ्या दिवशीही लसीकरणादरम्यान तांत्रिक अडचणी-
आज दुसऱ्या दिवशी देखील अनेक लाभार्थी लसीकरण केंद्राच्या बाहेर लस घेण्यासाठी गेले आहेत. मात्र निर्माण होणाऱ्या समस्यांमुळे लाभार्थी त्रस्त दिसून आले. सायन रुग्णालयात काल निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणीमुळे लाभार्थ्यांना समस्यांना सामोरे जावे लागू नये, म्हणून त्यांचे नाव नंबर लिहून घेऊन त्यांना पुढील दिवशी बोलावणार असल्याच्या सूचना देखील दिल्या होत्या. मात्र आज तांत्रिक अडचणी दूर होतील, अशी अपेक्षा होती. मात्र सलग दुसऱ्या दिवशीही लसीकरणादरम्यान तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले. सध्या मुंबईत 30 लसीकरण केंद्र आहेत. तर नव्याने तीन खासगी रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी देण्यात आली आहे.
हेही वाचा- दुसऱ्या दिवशीही कोविन अॅपचा गोंधळ; लसीकरणासाठी अडचणी