मुंबई - मुंबई, ठाणे, पालघर आदी जिल्ह्यातील सरकारी, खासगी आणि इतर माध्यमांच्या शाळातील शिक्षकांना लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. रेल्वे विभागाने शिक्षकांना प्रवासासाठी परवानगी देत असल्याचे पत्र राज्य सरकारला पाठवले आहे. यामुळे आता मुंबई आणि परिसरातील शाळांमध्ये अध्यापनाचे काम करणाऱ्या शिक्षकांना व त्यासोबतच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करता येणार आहे.
मागील महिन्यापासून सरकारी आणि अनुदानित शाळांतील शिक्षकांना शाळांमध्ये 50 टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. बहुतांश शिक्षक हे मुंबईबाहेर राहत असल्याने त्यांना प्रवासासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेचे सचिव सुधीर घागस, शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे आदींनी शिक्षकांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात यावी, अशी मागणी लावून धरली होती. यामुळे शिक्षकांची अडचण लक्षात घेऊन राज्याने केंद्राकडे पाठपुरावा केला हेता. या पाठपुराव्याला उशिरा का होत नाही पण यश आले आहे. आता या शिक्षकांना लोकलने प्रवास करता येणार आहे.
७० हजार शिक्षकांना होणार लाभ
मुंबई आणि परिसरात असलेल्या सरकारी, अनुदानित आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये सुमारे ७० हजाराहून अधिक शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यरत आहेत. विशेषत: मुंबईमध्ये असलेल्या शाळांमध्ये या शिक्षकांना रोज प्रवास करावा लागतो. मात्र त्यांना लोकलने प्रवास करण्याची मुभा नव्हती. यामुळे शाळांचे अनेक कामे रखडली होती. त्यातच सरकारकडून मागील महिन्यात शिक्षकांना 50 टक्के उपस्थिती बंधनकारक करण्यात आली होती. त्यामुळे त्यांची अडचण निर्माण झाली होती. आता लोकलने प्रवास करता येणार असल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.
9 ते 12 पर्यंतचे वर्ग सुरू होणार
शालेय शिक्षण विभागाकडून राज्यात 23 नोव्हेंबरनंतर नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याची तयारी करण्यात आली आहे. यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. नववी ते बारावीपर्यंतच्या शिक्षकांना आपल्या अध्यापनाच्या कामासाठी या लोकल प्रवासाचा फायदा होणार असल्याचे शिक्षण क्रांती संघटनेचे सचिव सुधीर घागस यांनी सांगितले.