मुंबई - तौक्ते चक्रीवादळाचा मोठा फटका आज मुंबईतील झाडांना बसला आहे. सुसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस यामुळे संपूर्ण मुंबईत मिळून दुपारी 1 वाजेपर्यंत 221 झाडे उन्मळून पडल्याची माहिती मुंबई महानगर पालिकेच्या उद्यान व वृक्ष प्राधिकरणातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने 'ईटीव्ही भारत' ला दिली आहे. त्याचवेळी झाडे पडून आतापर्यंत 15 गाड्यांचे नुकसान झाल्याचेही त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, ज्या महत्वाच्या, रहदारीच्या रस्त्यावर झाडे पडली आहेत, त्या ठिकाणची उन्मळून पडलेली झाडे हटवण्याचे काम सद्या वेगात सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा - तौक्ते चक्रीवादळ; मुंबईतील जनजीवन ठप्प; बेस्टसह लोकल, विमानसेवा रखडली
एल वॉर्डमध्ये सर्वाधिक 36 झाडे पडली
पाऊस आणि वादळाचा मोठा फटका नेहमीच झाडांना बसतो. त्यानुसार गेल्या वर्षी निसर्ग वादळाच्या तडाख्यात शेकडो झाडे पडली होती. तर आज तौक्ते वादळाचा मोठा परिणाम मुंबईवर होत आहे. मुंबईत सर्व 24 ही वॉर्डमध्ये झाडे पडण्याच्या घटना घडल्या आहेत. आतापर्यंत, दुपारी 1 वाजेपर्यंत 221 झाडे पडल्याची माहिती या अधिकाऱ्याने दिली आहे. त्याचवेळी सर्वाधिक झाडे ही एल विभागा (कुर्ला पश्चिम) त पडली आहेत. सकाळपासून दुपारी 1 वाजेपर्यंत येथे 36 झाडे पडली आहेत. तर आर सेंट्रल (बोरिवली) आणि पी साऊथ विभागात केवळ एकच झाड पडले आहे. झाडे पडल्याची जशी माहिती मिळत आहे, तसे पडलेली झाडे हटवत रस्ते, महामार्ग मोकळे करून दिले जात असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले आहे.
हेही वाचा - मुंबईसह उपनगरामध्ये मुसळधार पाऊस, वाहतूक सुरूच
दोन घरांचे नुकसान
221 झाडांचा बळी आतापर्यंत या वादळाने घेतला आहे. तर दुसरीकडे झाडे पडून दुपारी1 वाजेपर्यंत 15 गाड्यांचे नुकसान झाले आहे. त्यांचवेळी झाड घरावर पडून दोन घरांचेही नुकसान झाले आहे. दरम्यान वाऱ्याचा आणि पावसाचा जोर अजूनही कायम असून अजून काही तास परिस्थिती अशीच राहणार आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत बळी गेलेल्या झाडांचा आकडा आणखी फुगण्याची शक्यता आहे.
दुपारी 1 वाजेपर्यंत कोसळलेल्या झाडांची माहिती:
वॉर्ड- झाडांची संख्या
ए-7
बी-4
सी-3
डी-9
ई-8
एफ नॉर्थ-9
एफ साऊथ-17
जी नॉर्थ-15
जी साऊथ-8
एच ईस्ट-8
एच वेस्ट-8
के ईस्ट-21
के वेस्ट-10
एल-36
एम ईस्ट-7
एम वेस्ट-12
एन-9
पी नॉर्थ-10
पी साऊथ-1
आर नॉर्थ-12
आर सेंट्रल-1
आर साऊथ-6
एस-5
टी-2