मुंबई - मुंबईत अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. ही कारवाई बांद्रा युनिटने (22 जून) रोजी खार पश्चिम परिसरामध्ये केली असून, या कारवाईत 205 ग्रॅम वजनाचे कोकेन जप्त केले आहे. या कोकेनची 51 लाख 25 हजार रुपये किंमत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
आफ्रिकन वंशाचा व्यक्ती संशयास्पद आढळून आला
मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाच्या बांद्रा युनिटला गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर सापळा रचण्यात आला. दरम्यान, आफ्रिकन वंशाचा व्यक्ती संशयास्पद आढळून आला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच, त्याच्याकडील बॅगेची तपासणी केली असता, 205 ग्राम कोकेन मिळून आले. आंतरराष्ट्रीय बाजारात या 205 ग्रॅम कोकेणची किंमत 51 लाख 25 हजार एवढी असल्याचे, समोर आले आहे.
मुंबई व उपनगरातील लोकांना कोकेनचा पुरवठा
अटक केलेला व्यक्ती निको पीयुस जॉन (60) हा अमली पदार्थ तस्कर टांझानियाचा नागरिक आहे. मुंबई शहरातील दक्षिण मुंबई व उपनगरातील वसाहतीमधील लोकांना गेल्या काही महिन्यांपासून तो कोकेनचा पुरवठा करत होता. मुंबई व आजूबाजूच्या परिसरामध्ये टांझानिया देशातील अमली पदार्थ तस्करी करणाऱ्यांची टोळी सक्रीय असल्याचेही समोर आले आहे.
कपड्यांच्या व्यापाराखाली अंमली पदार्थांची तस्करी
मुंबई शहरामध्ये टांझानिया नागरिक हे कपड व्यापाराच्या बहाण्याने येतात. त्यानंतर मुंबई व भारतातील इतर महत्त्वाच्या शहरांमध्ये येऊन अशा छुप्या पद्धतीने, अमली पदार्थांची खरेदी-विक्री करत असल्याचे समोर आले आहे. आता अटक करण्यात आलेल्या व्यक्तीवर अमली पदार्थ तस्करीचे अगोदरच 2 गुन्हे दाखल असल्याची माहितीही समोर आली आहे.