मुंबई - मुंबईत कोरोनाची रुग्ण संख्या घटत असली तरी पाश्चिमात्य देशात आलेल्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुढील काही महिने यंत्रणांसोबतच नागरिकांनी अधिक खबरदारी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. तसेच मास्क न वापरणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. दिवाळीनंतर पुढील १५ दिवस महत्वाचे असल्याने, जम्बो कोव्हीड सेंटर देखभाल व दुरूस्ती करून सज्ज ठेवावेत असंही मुख्यमंत्र्यांनी म्हंटले आहे.
कोरोनामुळे दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरात घ्यावयाच्या दक्षतेबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी परिवहन मंत्री अनिल परब, राज्य टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, महापालिका आयुक्त आय. एस. चहल, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशीषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, मुंबई महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त, सहआयुक्त, उपायुक्त यावेळी उपस्थित होते. मुंबई महानगरात माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम यशस्वी राबविल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्त आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन केले. यावेळी बोलतांना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, जनतेला दिवाळी सुखाची जावी यासाठी आपण सर्वांनी कोरोनाबाबत जागृती करावी.
मास्क न वापरण्याबाबत बेफिकीरी -
रुग्ण संख्या कमी होत असल्याने नागरिक मास्क वापरतांना दिसत नाहीत. मात्र हे चुकीचे आहे, कोरोनाच संकट अद्याप टळलेले नाही. त्यामुळे जे मास्क वापरणार नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. मास्क घालण्याबाबत जनतेत जनजागृती करावी. त्याचप्रमाणे भविष्यात जम्बो कोरोना सेंटरची गरज भासू शकते, या पार्श्वभूमीवर सर्व सेंटर तयार ठेवावेत. राज्यात पुरेसा औषधसाठा आहे की नाही याचा आढावा घ्यावा.
१५ दिवस अत्यंत महत्वाचे -
राज्य शासन टप्प्याटप्प्याने अनलॉक करत आहे. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण आवश्यक असून, दिवाळी आणि त्यानंतरचे १५ दिवस अत्यंत महत्वाचे आहेत. दिवाळीनंतर कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी गर्दी करू नये. तसेच ज्या व्यक्तींचा सातत्याने अनेकांशी संबंध येतो त्यांनी कोरोना चाचण्या करून घ्याव्यात. असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणालेत. तसेच मुंबईत पाच हजार खाटांचे रुग्णालय उभारण्याचा निर्धारही यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
पूरमुक्त मुंबईसाठी आतापासून तयारी करा
दरवर्षी मुंबईत पुरामुळे बिकट स्थिती निर्माण होते. नागरिकांचे हाल होतात. मात्र अशी परिस्थिती पुढच्या वर्षी निर्माण होऊ द्यायची नसेल तर आतापासून नियोजन करावे लागेल असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचा अभ्यास
माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचा मुंबईत कशाप्रकारे परिणाम झाला याबाबत टाटा इन्स्टीट्यूट ऑफ सोशल सायन्स (टीआयएसएस) संस्था अभ्यास करणार असल्याचे महापालिका आयुक्त चहल यांनी सांगितले. कोरोनाच्या मोफत चाचण्यांसाठी मुंबईत सध्या २४४ केंद्र सुरू करण्यात आले असून, दररोज २० हजार चाचण्यांचे उद्दिष्ट असल्याचे चहल यांनी सांगितले. त्याचबरोबर मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाईसाठी अतिरीक्त मनुष्यबळ नियुक्त करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.