मुंबई - सुशांतसिंह राजपूतचे वडील के के सिंह यांनी रिया चक्रवर्तीच्या विरोधात पाटणा येथे एफआयआर दाखल केली होती. या प्रकरणाची चौकशी पाटण्यात न होता मुंबईत व्हावी अशी मागणी करणारी याचिका रियाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यानंतर के के सिंह यांनी रियाच्या याचिकेच्या विरोधात गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हिएट दाखल केले.
सुशांतच्या वडिलांच्यावतीने अॅड. नितीन सलूजा यांनी याबाबत सांगितले. सुशांतच्या मृत्यूच्या सीबीआय चौकशीसाठी केलेली याचिका सुप्रीम कोर्टानेही फेटाळली आहे.
बुधवारी सुशांतच्या वडिलांनी पटना येथे रिया चक्रवर्तीच्याविरोधात एफआयआर दाखल केली होती. आपल्या मुलाची फसवणूक करुन त्याला धमकवल्याचा आरोप त्यांनी याचिकेत केला होता. त्याच दिवशी रिया चक्रवर्तीने या प्रकरणाची चौकशी पाटण्यात न करता मुंबईत चौकशी हस्तांतरित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
रियाचे वकील सतीश मानेशिंदे म्हणाले की, त्यांच्या आशिलाने सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. यात पाटण्यातील चौकशी मुंबईत स्थलांतरीत करण्याची मागणी करण्यात आली आहे, जिथे अभिनेत्याच्या मृत्यूसंबंधीची चौकशी आधीपासून सुरू आहे. मानेशिंदे यांनी याचिकेचा मजकूर शेअर करण्यास नकार दिला.
१४ जून रोजी सुशांतसिंहने आत्महत्या केली होती. त्या आधी सुशांत आणि रिया चक्रवर्ती रिलेशनशिपमध्ये होते. सुशांतच्या वडिलांनी रियावर फवणूक करुन वैद्यकीय अहवाल मीडियासमोर उघड करण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे.