मुंबई - आपले काम हे समर्पित भावनेने, एकाग्रतेने आणि मनापासून करा, ज्यामुळे त्या कामातून तुम्हाला अधिक अधिक समाधान मिळेल. त्याचबरोबर आपल्या वैयक्तिक आयुष्यात आपल्या वाट्याला येणारे छोटे-छोटे आनंद देखील आवर्जून घ्या, असा संदेश बृहन्मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी (Suresh Kakani) यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना (Health Workers) दिला.
दोन शस्त्रक्रिया गृहांचे लोकार्पण - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाच्या ७५ व्या वर्धापन दिन सोहळ्यात उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. आजच्या वर्धापन दिन सोहळ्यादरम्यान लोकमान्य टिळक रुग्णालयात नव्याने उभारण्यात आलेल्या दोन शस्त्रक्रियागृहांचे लोकार्पण काकाणी यांच्या हस्ते करण्यात आले. यापैकी एक शस्त्रक्रिया गृह हे अवयव प्रत्यारोपणासाठी; तर दुसरे शस्त्रक्रियागृह पोटाच्या विकारांंशी संबंधित शस्त्रक्रिया करण्यासाठी उपयोगात येणार आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या नवीन सभागृहाचे लोकार्पण देखील करण्यात आले.
उपस्थितांना मार्गदर्शन - कार्यक्रमातील पहिल्या सत्रादरम्यान सुप्रसिद्ध ओबेसिटी सर्जन डॉक्टर संजय बोरुडे यांनी लठ्ठपणा विषयक व्यवस्थापन आणि बॅरिॲट्रिक सर्जरी याबद्दल सविस्तर माहिती संगणकीय सादरीकरणासह उपस्थितांना दिली. यानंतरच्या सत्रामध्ये डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांनी बदलत्या जीवनशैलीमध्ये आहाराचे महत्त्व आणि मधुमेहासारख्या आजारावर मात करण्यासाठी आहारात, आहाराच्या प्रमाणात आणि आहाराच्या वेळेत कोणते बदल करावेत याबाबत विविध उदाहरणांसह सविस्तर मार्गदर्शन उपस्थितांना केले.
५ पुस्तकांचे प्रकाशन - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या ५ पुस्तकांचे प्रकाशन अतिरिक्त महापालिका आयुक्त काकाणी यांच्या हस्ते करण्यात आले. ज्यामध्ये संसर्गजन्य रोग, आरोग्य दिन विशेष, पावसाळ्यातील आजार, असंसर्गजन्य रोग आणि 'महिला व बाल आरोग्य'; या पाच पुस्तकांचा समावेश आहे.