मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ब्रीच कैंडी रुग्णालयात दुसरी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांची प्रकृती स्थिर आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी फेसबूकवर भावनिक पोस्ट केली. बाबांवरील शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतरचा हा गुढीपाडवा असल्याचे त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं. तसेच त्यांनी कोरोनापासून सुरक्षीत राहण्याचे आवाहन नागरिकांना केले. तसेच शरद पवार सध्या रुग्णालयातच असल्याचे त्यांनी सांगितले.
साहेबांवरील शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतरचा हा गुढीपाडवा आहे. बाबा अजूनही हॉस्पिटलमध्ये आहेत.त्यांना भेटण्यासाठी अजितदादा आणि सुनेत्रावहिनी आले. यानिमित्ताने आई, बाबा, दादा-वहिनी आणि आम्ही दोघे असे सर्वजण हॉस्पिटलमध्ये एकत्र आलो. सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने नेहमीच्या उत्साहाने गुढीपाडवा सण साजरा करता येत नाही. पण कुटुंबीयांच्या सोबत आनंदाचे क्षण वाटून घेऊन आपणास या परिस्थितीवर मात करण्याची ऊर्जा मिळेल. गुढीपाडव्याचा हा सण आनंदाने साजरा करा.काळजी घ्या, सुरक्षित रहा, अशी फेसबूक पोस्ट सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
शरद पवार यांच्या दोन शस्त्रक्रिया -
शरद पवार यांच्यावर दोन शस्त्रक्रिया झाल्या आहेत. पहिली शस्त्रक्रिया 30 मार्चला रात्री झाली होती. त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी सुप्रिया सुळे यांनी पवारांचा वर्तमानपत्र वाचतानाचा फोटो शेअर केला होता. त्यांनी एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये रुग्णालयात वृत्तपत्र वाचून शरद पवार महाराष्ट्राचा आढावा घेताना दिसले होते. शरद पवार यांच्यावर लॅप्रोस्कोपी ही शस्रक्रिया पार पडली. अर्धा तास ही शस्रक्रिया चालली होती. त्यानंतर गॉल ब्लॅडरची आणखी एक शस्रक्रिया केली गेली. त्यानंतर काही दिवसांची विश्रांती देऊन शरद पवार यांच्यावर आणखीन एक शस्त्रक्रिया करण्यात आली.
हेही वाचा - प्रिन्स हॅरीचे पंजाबमधील महिलेला दिले लग्नाचे वचन ?, वाचा काय आहे प्रकरण