मुंबई - विधान परिषद निवडणुकीमध्ये ( Legislative Council elections ) मतदान करू देण्याबाबतची राज्याचे मंत्री नवाब मलिक ( Nawab Malik ) आणि माजी मंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळली आहे. याआधी या दोघांनी मतदान करण्यासंदर्भातील आपली याचिका मुंबई उच्च न्यायालयातही दाखल केली होती. उच्च न्यायालयाने त्यांच्या याचिका फेटाळल्यानंतर ते दोघे सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी गेले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयातही त्यांना दिलासा मिळू शकलेला नाही.
आता मतदान करता येईल का? - माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांनी विधान परिषदेमध्ये मतदान करण्यात यावे यासाठी दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. याचिका फेटाळतानाच सर्वोच्च न्यायालयाने देशमुख आणि मलिक यांना विचारले की, न्यायालयाने परवानगी दिल्यास आता मतदान करता येईल का?
मतदानाची प्रक्रिया पूर्ण - आज विधानपरिषदेचे मतदान नुकतेच पार पडले. यावेळी काही मिनिटेआधीच मलिक आणि देशमुखांच्या मतदान हक्कावर सुनावणी झाली. विधानपरिषदेत मतदान करता यावे म्हणून नवाब मलिक आणि अनिल देशमुखांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने आरोपीला मतदान करता येणार नाही असे म्हणत त्यांची याचिका फेटाळून लावली होती. त्यांनतर मलिक आणि देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, त्यांनी ही याचिका उशिरा दाखल केली असल्याचा न्यायालयात युक्तिवाद करण्यात आला. तसेच मुंबई उच्च न्यायालयाने जो निकाल दिला तोच निकाल कायम असल्याचे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. यावेळी मलिक आणि देशमुखांच्या वकिलाने वेगवेगळे दाखले देऊन त्यांची बाजू मांडली होती. मात्र सर्वोच्च न्यायालायने तुम्ही उशिरा का याचिका दाखल केली, असे म्हणत त्यांना फटकारले आहे.
राज्यसभा निवडणुकीतही मतदान नाही - मतदानाला काही मिनिटे शिल्लक असताना जरी याचिका मान्य केली तरी त्याचा काही उपयोग नाही, असं देखील न्यायालयाने म्हटले आहे. राज्यसभा निवडणुकीत मतदान करता यावे यासाठीही त्यांनी याचिका केली होती. मात्र तेव्हाही न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली होती. दरम्यान, विधानपरिषदेच्या मतदानाची प्रक्रिया 5 वाजता पूर्ण झाली आहे. काहीवेळाने मतमोजणी सुरुवात होऊन निकाल हाती येऊ शकेल.
हेही वाचा -अग्निपथ योजना: सैन्याने जाहीर केली संपूर्ण अटी आणि शर्तींसह योजनेची माहिती