मुंबई - कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी देशात लसीकरण मोहीम सुरू आहे. यासाठी पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटकडून मुंबईला दुसऱ्या टप्प्यात १ लाख २५ हजार 'कोव्हीशिल्ड' लसीचा पुरवठा झाला आहे. यामुळे मुंबईला आतापर्यंत २ लाख ६४ हजार ५०० लस उपलब्ध झाल्या आहेत.
२ लाख ६४ हजार लसीचे डोस उपलब्ध -
मुंबईमध्ये मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. गेले दहा महिने केलेल्या प्रयत्नामुळे कोरोनाचा प्रसार काही प्रमाणात कमी झाला आहे. केंद्र सरकारने पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटच्या 'कोव्हीशिल्ड' आणि भारत बायोटेकच्या 'कोव्हॅक्सिन'या लसींना अपवादात्मक परिस्थितीत वापरण्यास परवानगी दिली आहे. सिरम इन्स्टिट्युटने तयार केलेल्या 'कोव्हीशिल्ड' लसीचा १ लाख ३९ हजार ५०० चा साठा १३ जानेवारीला मुंबईत दाखल झाला. तर गुरुवारी २१ जानेवारीला पहाटे दुसऱ्या टप्प्यात १ लाख २५ हजार डोस पालिकेला उपलब्ध झाले आहेत. आतापर्यंत पालिकेला २ लाख ६४ हजार ५०० लसीचे डोस उपलब्ध झाले आहेत. परळ येथील पालिकेच्या एफ साऊथ वॉर्डमध्ये लस साठवणूक केंद्रात ही लस ठेवण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
असे केले जातेय लसीकरण -
मुंबईत १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात १ लाख २५ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. परळ येथील राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालयात, शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात, मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालय, विलेपार्लेचे डॉ. आर. एन. कूपर रुग्णालय, वांद्रे येथील भाभा रुग्णालय, सांताक्रूझचे व्ही. एन. देसाई रुग्णालय, घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालय, कांदिवलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, बीकेसी भव्य कोविड सुविधा केंद्र तसेच राज्य सरकारच्या जे जे रुग्णालय या दहा लसीकरण केंद्रांवर ४० बूथद्वारे लसीकरण केले जात आहे. दिवसाला ४ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचे उद्दिष्ट पालिकेने ठेवले आहे.
लसीकरणाची आकडेवारी -
मुंबईत १६ जानेवारीला १९२६, १९ जानेवारीला १५९७, २० जानेवारीला १७२८, २२ जानेवारीला ३५३९ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली.