मुंबई - शहरात कोरोनाचा प्रसार कमी करण्यासाठी लसीकरण मोहीम सुरू आहे. या मोहिमेत 45 वर्षावरील नागरिकांचे, परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे, स्तनदा मातांचे तसेच दिव्यांग नागरिकांचे लसीकरण लवकरात लवकर करता यावे, यासाठी सोमवार ते बुधवारी लसीकरण केंद्रांवर थेट लसीकरण करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी परिपत्रक काढले आहे.
45 वर्षावरील नागरिकांचे थेट लसीकरण
बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोविड- 19 या आजाराकरीता प्रतिबंधात्मक लसीकरण राबविण्यात येत आहे. या लसीकरण मोहिमेत 60 वर्षे व अधिक वयोगटातील अंदाजित 11 लाख लोकसंख्येपैकी 8 लाख 53 हजार, म्हणजेच 78 टक्के एवढ्या लाभार्थ्यांना कोविड -19 लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे या वयोगटातील नागरिकांसाठी पहिल्या डोससाठी लसीकरण केंद्रात थेट लसीकरण करून घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार प्रतिदिन सरासरी केवळ 7000 लाभार्थी लाभ घेत होते. पंरतु 45 वर्षे व अधिक वयोगटातील 19 लाख नागरिकांपैकी पहिल्या डोससाठी साधारण 9 लाख नागरिक प्रतीक्षेत आहेत. 60 वर्षे व अधिक वयोगटातील नागरिकांचा अल्प प्रतिसाद लक्षात घेता 45 वर्षे व अधिक वयोगटातील नागरिकांना पहिला डोस घेता यावा, यासाठी पालिकेने सुधारित परिपत्रक काढले आहे.
नवे परिपत्रक
नव्या परिपत्रकानुसार सोमवार, मंगळवार व बुधवार या दिवशी 45 वर्ष व अधिक वयोगटातील नागरिक तसेच दिव्यांगांना प्राधान्याने कोविशील्ड लसीच्या पहीला व दुसरा डोस दिला जाईल. आरोग्य कर्मचारी व फ्रंट लाईन म्हणून काम करणारे इतर कर्मचाऱ्यांना कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस देण्यात येईल. कोवॅक्सीन लसीच्या दुसऱ्या डोसचे लाभार्थी यांना थेट लस घेता येईल. स्तनदा मातांना प्रसुतिनंतर 1 वर्षापर्यंत, बाळाचा जन्मदाखला दाखवून लस घेता येईल.
परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण
मुंबईतील रहिवासी असलेल्या 18 ते 44 वर्षे वयोगटातील उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक वैध पुराव्यानिशी म्हणजेच परदेशी विद्यापीठ प्रवेश मिळाल्याचे निश्चितीपत्र, परदेशी व्हिसा, व्हिसा मिळण्यासाठी संबंधित विद्यापीठाकडून प्राप्त झालेले 1-20 किंवा DS - 160 फॉर्म असल्यास कस्तुरबा, राजावाडी व कुपर रुग्णालय या तीन लसीकरण केंद्रावर थेट जाऊन लसीचा लाभ घेता येईल.
गुरुवार ते शनिवार नोंदणी आवश्यक
गुरुवार, शुक्रवार व शनिवार या दिवशी कोविन अॅपवर नोंदणी तसेच लसीकरण केंद्र व वेळ निश्चित झाल्यानंतरच प्रत्येक लसीकरण केंद्रावर 100 टक्के लसीकरण केले जाईल. रविवारी लसीकरण कार्यक्रम बंद राहिल असे परिपत्रकात म्हटले आहे.
हेही वाचा - म्युकरमायकोसिसच्या रुग्णसंख्येनुसार महाराष्ट्रात इंजेक्शनचा पुरवठा करा; केंद्राला उच्च न्यायालयाच्या सूचना