मुंबई - विविध नाविण्यपूर्ण योजनांसह अनेक विकासकामांना प्राधान्यक्रम देत मुंबई विद्यापीठाचा विद्यार्थीकेंद्रीत आणि सर्वसमावेशक असा २०२२-२३ या वर्षांचा रुपये ८०९ कोटीचा अर्थसंकल्प अधिसभेत सादर करण्यात आला. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या अधिसभेत यावर्षीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये रुपये ७३ कोटी ८८ लाखाची तूट दाखविण्यात आली आहे.
भरीव आर्थिक तरतूद - यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये विविध नाविण्यपूर्ण योजनांसह अनेक विकासकामांना प्राधान्य देत विविध भागांमध्ये या वर्षीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यामध्ये डिजीटल युनिव्हर्सिटी, ग्रॅफिटायझेशन मशीन फॉर मुंबई युनिव्हर्सिटी एक्सलेटर सेंटर, डिजीटल ग्रंथालय, इंटर्न्स अँड एप्रेनटिस, सेंटर फॉर एक्सलेंस इन ॲरोटिकल अँड कम्प्युटेशनल सायन्स, स्पोर्ट्स कॉम्पलेक्सची स्थापना, नवीन ग्रंथालय फर्निचर व इक्वीपमेंट, मुंबई विद्यापीठ माजी विद्यार्थी संघ स्थापना, विद्यापीठ परिसराचे सुशोभिकरण, विद्यापीठ परिसर विकास, युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यू सेल, सेंटर फॉर एक्सलेंस इन स्पोर्ट्स सायन्स अँड मॅनेजमेंट, सेंट्रल इन्स्टयुमिनिशन फॅसिलिटी, सेंटर फॉर नॅशनल अँड इंटरनॅशनल स्टूडेन्ट्स अँड लिंकेजिअस, मुंबई म्युन्स्टर इंस्टीट्यूट ऑफ एडव्हान्स स्टडीज, एकॅडेमिक ऑडिट पोर्टल फॅसिलिटी टू स्टेट युनिव्हर्सिटी इन महाराष्ट्र स्टेट, मराठी युनिकोड सॉफ्टवेअर अँड ट्रेनिंग, पानिणी चेअर, स्वामी विवेकानंद चेअर या नाविण्यपूर्ण उपक्रमासोबतच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कला आणि सास्कृतिक केंद्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र, सामाजिक व आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य यासाठी भरीव आर्थिक तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे.
पायाभूत सुविधेवर भर- रत्नागिरी, ठाणे, सिंधुदुर्ग, पालघर आणि रायगड येथील विद्यापीठ उपपरिसरात परीक्षांसाठी पायाभूत सुविधांसाठी विशेष अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. ख्यातनाम शिक्षकांना निवृत्तीनंतर सेवेत कार्यरत ठेवण्यास निधी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी निवासस्थान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श महाविद्यालय अंबाडवे येथे मिनी बस, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित होणाऱ्या विविध नाविण्यपूर्ण कार्यक्रमासाठीही अर्थसंकल्पीय तरतूद करून वैविध्यपूर्ण आणि नाविण्यपूर्ण उपक्रमांवर आधारीत विशेष अर्थसंकल्पीय तरतूदींसह विद्यापीठ सुधारणांवर भर देत विद्यार्थी केंद्रीत अर्थसंकल्प आजच्या अधिसभेत सादर करण्यात आला.
नियोजित बांधकामाना प्राधान्य - २०२२-२०२३ या वर्षामध्ये नियोजित बांधकामांना विशेष प्राधान्यक्रम देण्यात आले असून यामध्ये खेळांचे इनडोअर संकुल, बाबू जगजीवन राम मुलांचे आणि मुलींचे वसतिगृह, शैक्षणिक कर्मचाऱ्यांचे निवासी संकूल, तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे निवासी संकूल व सामुदायिक सभागृह, तत्वज्ञान केंद्र, प्रा. बाळ आपटे दालन, स्कुल ऑफ लॅग्वेजेस इमारत (२ रा टप्पा), आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृह (२ रा टप्पा), डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र अशा नियोजित बांधकामाना प्राधान्य देण्यात आले आहे.