मुंबई - कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या "स्मार्ट कार्ड " योजनेला ३० सष्टेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. तथापि सध्याची कोविड -१९ ची परिस्थिती लक्षात घेऊन या योजनेला ३१ डिसेंबर, २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली आहे.
प्रवाशांना पूर्वीप्रमाणे सवलत लागू -
महाराष्ट्र् शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून सुमारे २९ विविध सामाजिक घटकांना ३३ टक्के पासून १०० टक्के पर्यंत प्रवासी भाड्यामध्ये सवलत देते. या सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थींना आधार क्रमांकाशी निगडीत असलेल्या " स्मार्ट कार्ड " काढण्याची योजना एसटीने सुरू केली आहे. त्यानुसार एसटीच्या प्रत्येक आगारामध्ये ज्येष्ठ नागरिक व अन्य सवलत धारकांना स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने गर्दी होणारे कार्यक्रम उपक्रम राबविले जाऊ नये, असे निर्देश दिले असल्याने तसेच अनेक जेष्ठ प्रवाशांना आगारात येऊन स्मार्टकार्ड घेणे शक्य नसल्याने सदर योजनेला पुढील ३ महिने, म्हणजेच ३१ डिसेंबर,२०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती मंत्री परब यांनी दिली आहे. त्यामुळे प्रवाशांना पूर्वीप्रमाणे सवलत लागू राहणार आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.
हे ही वाचा -पुन्हा घंटा वाजणार.. राज्यातील शाळा 4 ऑक्टोबरपासून होणार सुरू, मात्र.. शिक्षणमंत्र्यांनी सांगितली नियमावली
स्मार्ट कार्ड योजनेचे ३४ कोटी लाभार्थी -
तोट्याचा सामना करणाऱ्या एसटीतर्फे ज्येष्ठ नागरिकांना प्रवासात सवलत देण्यात येते. विद्यार्थी, अंध, अपंग, आदिवासी, ज्येष्ठ नागरिक, खेळाडू आदींना तिकिटांमध्ये सवलत दिली जाते. सवलतीच्या रक्कमेचा परतावा राज्य सरकारच्या संबंधित विभागाकडून केला जातो. याप्रकारे एसटीच्या सवलतीत प्रवास करणाऱ्या एकूण ३८ कोटी लाभार्थ्यांपैकी ३४ कोटी लाभार्थी हे फक्त ज्येष्ठ नागरिक आहेत. महामंडळातर्फे ज्येष्ठ नागरिकांना साध्या, निमआराम बसमध्ये ५० टक्के, शिवशाहीमध्ये ४५ आणि शिवशाही स्लीपरमध्ये ३० टक्के सवलत दिली जाते. सवलतीच्या प्रवासामुळे ज्येष्ठ नागरिकांचाही ओढा एसटीकडे मोठ्या प्रमाणात आहे.
हे ही वाचा - नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून राज्यातील सर्वधर्मीय धार्मिकस्थळं होणार खुली; मुख्यमंत्र्यांचा निर्णय
काय आहे स्मार्ट कार्ड योजना -
एसटी महामंडळाच्या माध्यमातून सुमारे 29 विविध सामाजिक घटकांना 33 टक्के पासून 100 टक्केपर्यंत प्रवासी भाड्यामध्ये सवलत देण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थींना आधार क्रमांकाशी निगडीत असलेल्या ‘स्मार्ट कार्ड’ काढण्याची योजना एसटीने सुरु केली आहे.
त्यानुसार एसटीच्या प्रत्येक आगारामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि अन्य सवलत धारकांना स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रिया सुरु आहे. परंतु कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेक प्रवाशांना आगारात येऊन स्मार्ट कार्ड घेणे शक्य नाही.तसेच त्यासंबंधीची माहिती आगारात येऊन प्रत्यक्ष देता येत नसल्याने या योजनेला पुढील सहा महिने म्हणजेच 30 सप्टेंबर, 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ज्या भागात एसटी बस सुरू असतील त्या भागांमध्ये प्रवाशांना पूर्वीप्रमाणे सवलत लागू राहणार आहे असे परिवहनमंत्री परब यांनी सांगितले.