मुंबई - मुंबईसह राज्यभर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे परत एकदा लॉकडाउनची परिस्थिती उद्भवली आहे. प्रथम लॉकडाऊन लागले तेव्हा समाजातील सर्व स्तरातील घटकांनी प्रशासनाला सहकार्य केले. परंतु सरकारने लॉकडाऊन लावत नाही, असं सांगत जे कडक निर्बंध लावले आहेत. त्यावर आता निषेधात्मक सूर ऐकायला मिळत आहे.
"आपकी बार सिर्फ बेरोजगार"-
मुंबईत आज बऱ्याच व्यापाऱ्यांनी आणि हॉटेल व्यावसायिकांनी हॉटेलच्या बाहेर निषेधात्मक तसेच सूचनात्मक संदेश देणारे बॅनर लावून प्रशासनाच्या विरोधात जोरदार बॅनरबाजी केली आहे. "आपकी बार सिर्फ बेरोजगार" तसेच "व्यापारी हे देशात दुसऱ्या क्रमांकाचे रोजगार पुरवणारे क्षेत्र आहे" अशा आशयाचे बॅनर मुंबईत आज जागोजागी व्यापाऱ्यांच्या बंद असलेल्या दुकानाच्या शटरवर तर अर्धवट सुरू असलेल्या हॉटेल्सच्या बाहेर काउंटरवर लावलेले दिसले. याआधी सुद्धा मुंबईतील व्यापारी संघटनांनी सरकारने लावलेल्या निर्बंधांविरोधात आंदोलन केले होते. तसेच आपल्या दुकानाच्या बंद असलेल्या शटरवर सूचक असे संदेशात्मक बॅनर लावून सरकारची झोप उडवली होती.
टाळेबंदीला विरोध-
राज्य सरकारच्या या अंशत: टाळेबंदीला विविध भागांतून विरोध होत आहे. नवी मुंबई व्यापारी महासंघाने विरोध केला असून करोनाने कमी मृत्यू पावतील पण या टाळेबंदीने जास्त मरतील, अशा घोषणा देण्यात आल्या होत्या. त्यामुळे बेलापूर, नेरुळ, वाशी, कोपरखैरणे, ऐरोली येथील व्यापाऱ्यांनी सकाळी काही काळ दुकाने उघडून या टाळेबंदीला विरोध केला. पण नंतर पालिका व पोलिसांच्या गस्त सुरू झाल्यानंतर ही दुकाने बंदी करण्यात आली. जमावबंदी असल्याने पाचपेक्षा जास्त नागरिक एकत्र आल्यास त्यांच्यावर कारवाई होणार असल्याने ही पांगापांग झाली.
हेही वाचा- भाजप नेत्यांकडून त्यांच्या आमदारांना गाजर दाखवण्याचे काम - उपमुख्यमंत्री