मुंबई - हल्ली कोण कुणाला कशी टोपी घालेल काही सांगता येत नाही. आज आपण सर्व मोठ्या अभिमानाने स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना चक्क राष्ट्रगीताची चोरी झाल्याची बाब उघड झाली आहे. 2010 साली अभिनेता पुष्कर श्रोत्री याने आपल्या कंपनीकडून 75 मराठी कलाकारांना एकत्रित आणून एक राष्ट्रगीताचा व्हिडीओ तयार केला होता. या व्हिडीओ मध्ये दिवंगत अभिनेते निळू फुले यांच्यापासून 'श्वास' सिनेमाद्वारे घराघरात पोहोचलेला बालकलाकार अश्विन चितळे पर्यंत अनेक कलाकारांचा समावेश करण्यात आला होता.
काही वर्ष मराठी सिनेमे लागणाऱ्या थिएटर मध्ये हे राष्ट्रगीत लावले जात असे. यानंतर वेगवेगळी राष्ट्रगीत लावण्यापेक्षा एकच राष्ट्रगीत लावण्याबाबत कोर्टात याचिका करण्यात आली. त्यामुळे फक्त भारतीय ध्वज फडकत असणार राष्ट्रगीत लावण्याची सक्ती कोर्टाकडून सर्वच थिएटर्स आणि मल्टिप्लेक्स चालकांना करण्यात आली. त्यामुळे सर्वच चित्रपटगृहात सिनेमा सुरू होण्यापूर्वी नवे राष्ट्रगीत लावण्यात येऊ लागले.
त्यानुसार फक्त राष्ट्रध्वज असलेले राष्ट्रगीत थिएटरमध्ये वाजू लागले. मात्र, अनेक दिवस त्यात काही वावगे जाणवले नाही. नुकत्याच 9 ऑगस्टला रिलीज झालेल्या 'येरे येरे पैसा- 2' हा सिनेमा पहाताना अभिनेता पुष्कर श्रोत्री याला थिएटरमध्ये वाजत असलेल्या राष्ट्रगीताची धून ही आपण तयार केलेल्या राष्ट्रगीतातील असल्याचे जाणवले. मात्र राष्ट्रगीताच्या अखेरीस कुणा दिनेश खंडेलवाल यांचे नाव दिसले. एवढचं नाही तर मूळ राष्ट्रगीत मराठी कलाकारांनी गायलेले असूनही, इथे व्होकल म्हणून प्रणय प्रधान, संकेत आणि देवकी खंडेलवाल यांची नाव देण्यात आली आहेत. ही मराठी कलाकार म्हणून आपली फसवणूक आहेच, पण त्यासोबत या खंडेलवाल नावाच्या व्यक्तीने हेच राष्ट्रगीत सरकारला विकून सरकारचीही फसवणूक केली असल्याचे पुष्कर श्रोत्री यांचे म्हणणे आहे.
इतके दिवस ही फसवणूक निदर्शनास आली नसल्याने सुरू राहिली. मात्र, यापुढे ती तातडीने थांबावी अशी मागणी पुष्करने केली आहे. याबाबत केंद्र आणि राज्य सरकारकडे रीतसर तक्रार करून दाद मागणार असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. एकीकडे संपूर्ण देश उत्साहात आणि आनंदात स्वतंत्र्यदिन साजरा करत असताना ही चोरी उघड होणं निश्चितच दुर्दैवी आहे. मात्र, एखाद्याने ठरवले तर सरकारची तो कशी आणि किती फसवणूक करू शकतो ते या प्रकाराने उघड झाल आहे.