मुंबई - अन्न आणि औषध प्रशासना (एफडीए) ने वांद्रे रेल्वे टर्मिनस येथून आज सुगंधित सुपारीचा साठा जप्त केला आहे. 3600 पाकिटांचा हा साठा असून याची किंमत 1 लाख 44 हजार रुपये अशी आहे.
राज्य सरकारने राज्यात गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्री-उत्पादनावर बंदी टाकली आहे. बंदी टाकून बराच काळ झाला तरी राज्यात छुप्या पध्दतीने विक्री सुरूच आहे. एफडीएच्या कारवाईतून वारंवार ही बाब समोर येत आहे. राज्यात गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या उत्पादनावर बंदी असल्याने शेजारच्या राज्यातून गुटखा, सुगंधित सुपारी, पानमसाला छुप्या पध्दतीने आणतात आणि त्याची विक्री केली जाते. तर एफडीएकडून बेकायदेशीररित्या विक्री करणाऱ्या आणि प्रतिबंधित अन्न पदार्थ परराज्यातून आणणाऱ्याविरोधात एफडीएकडून कारवाई करण्यात येते. मात्र तरीही राज्यात 100 टक्के बंदी यशस्वी होताना दिसत नाही. त्यामुळे कारवाईसंदर्भातील नियम आणखी कडक करण्याची मागणी होत आहे.
3600 पाकीट जप्त
एफडीएच्या बृहन्मुंबई विभागाला गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार आज पहाटे पाच वाजता अधिकाऱ्यांनी वांद्रे रेल्वे टर्मिनस समोर सापळा रचला होता. यावेळी यासिन हसन शेख नावाची व्यक्ती हातगाडीवरून सुगंधित सुपारीची वाहतूक करताना आढळला. त्याच्याकडून यावेळी 3600 पाकीटे जप्त केली असून याची किंमत 1 लाख 44 हजार रुपये अशी असल्याची माहिती शिशिकांत केकरे, सहआयुक्त, बृहन्मुंबई (अन्न) यांनी दिली आहे. याप्रकरणी निर्मल नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
3 लाख 33 हजाराचे भेसळयुक्त तेलही जप्त
एफडीएच्या बृहन्मुंबई विभागाने काल, बुधवारी भेसळयुक्त तेलही जप्त केले आहे. दहिसर पूर्व येथील मेसर्स ओम ट्रेडिंग येथे छापा टाकत 3428 किलोचा भेसळयुक्त तेलाचा साठा जप्त केला असून याची किंमत 3 लाख 33 हजार 912 रुपये अशी आहे. जुन्या, वापरलेल्या डब्याचा वापर तेल भरण्यासाठी केला जात होता. दरम्यान, तेलाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. याचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे ही केकरे यांनी सांगितले आहे.