मुंबई - चेकपोस्ट, विलगीकरण, कोरोना पेशंटचे सर्व्हेक्षण ही कामे कमी झाली की काय ? शिक्षकांना आता चक्क धरण फुटीकडे लक्ष देण्याचे आदेश देण्यात आले असून शिक्षकांची ही कामे रद्द करण्याची मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उपविभागीय अधिकारी, दापोली यांनी समक्ष दिलेल्या तोंडी सूचनेप्रमाणे तालुक्यातील पणदेरी गावातील धरणाची गळती सुरू झाल्याने आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. धरणामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा असल्याने गळतीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे तेथील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी व तेथील परिस्थितीची माहिती प्रशासनाला कळविण्यासाठी याठिकाणी शिक्षकांच्या नेमणूका करण्यात आले आहे. तसेच नेमून दिलेल्या वेळेत उपस्थित राहून धरणाचे सद्यस्थितीचे अहवाल देण्याचे फर्मान मंडणगड आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिले आहे. हे कामकाज करताना कोविड १९ बाबतचे सर्व नियम पाळून कामकाज करण्यात यावे. आदेश प्राप्त होताच त्वरित कामकाजास सुरूवात करण्यात यावे. याबाबत विलंब करणाऱ्या कर्मचारी-अधिकारी यांच्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ३०, ३३, ३४, ४१ व ५१ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ४३, ५३ अंतर्गत कठोर कारवाई करण्याचे पत्रात नमूद केले आहे.
'राज्यात शिक्षकांची अवहेलना'
भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी सांगितले, की राज्यात शिक्षकांनी अध्यापक सोडून इतर कामे करा, असे फर्मान काढले आहे, अशी काही शंका यायला लागली आहे. या कोरोनाच्या काळामध्ये कोरोना रुग्णाची सर्वेक्षण करा, चेक पोस्टवर काम करा, विलगीकरण कक्षात काम करा हे ठीक होते. परंतु रेशन दुकानदारांवरील रांग व्यवस्थित करा, दारूच्या दुकानासमोरील रांग व्यवस्थित करा, आता ही कामे कमी होत असतांना, दापोलीच्या पणदेरी गावातील धरण आहे. या धरणाला गळती लागलेली आहे. ह्या गळतीवर लक्ष ठेवण्यासाठी शिक्षकांची ड्युटी लावण्यात आले आहे. त्यामुळे या राज्यांमध्ये शिक्षकांची किती अवहेलना होत आहे. शासनाने वेळीच लक्ष द्यायला पाहीजे. शिक्षणाचा मोफत व सक्तीचा कायदा पाहिला, या कायद्यामध्ये प्रत्यक्ष निवडणुकीचे कामे आणि आपत्कालीन व्यवस्था याच्या व्यतिरिक्त कुठलेही काम देऊ नयेत, असे सांगितल्यावर सुद्धा याराज्यांमध्ये आरटीई कायदायचे उल्लंघन होते, हे शासनाने लक्षात ठेवायला पाहिजे, असे बोरनारे यांनी सांगितले आहे.
'शिक्षकांची ही कामे रद्द करा'
राज्यभरात कोरोनाच्या दुसर्या लाटेने हाह:कार माजवला आहे. या लाटेला थोपविण्यासाठी राज्य सरकारनकडून लॉकडाऊन लागू करण्यात आलेला होता. तसेच आरोग्य यंत्रणेवर ताण येत असल्याने राज्य शासनाने ताण कमी करण्यासाठी राज्यातील 25 हजारहून अधिक शिक्षकांना कोरोना ड्युटी लावली होती. शासनाच्या नियमांचा धाक दाखवत शिक्षकांना कोविड कामाला जुंपण्यात येत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात शिक्षकांना विलगीकरण कक्ष, सर्वेक्षण, चेक पोस्ट व अन्य ठिकाणी नियुक्त करण्यात आले होते. आता राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच शिक्षकांना चक्क धरण फुटीकडे लक्ष देण्याचे आदेश देण्यात आले असून शिक्षकांची ही कामे रद्द करण्याची मागणी भाजपाकडून केली जात आहे.
कोरोना काळात शिक्षकांची कामे -
- शिक्षकांना आरोग्य सेवकाची कामे
- रुग्णांच्या शरीराचे तापमान मोजणे
- घरी विलगीकरणात असलेल्या रुग्णांना प्रत्यक्ष भेटी देऊन सेल्फी काढणे
- शिधावाटप दुकान, घरोघरी भेट देणे
- नाकाबंदीच्या काम करणे
- कोरोना रुग्णाचे सर्वेक्षण करणे
- शिक्षकांना निवडणुकीच्या कामाचीही जबाबदारी
हेही वाचा -Pankaja Munde : ...अन् वडिलांच्या आठवणीने पंकजा मुंडे गहिवरल्या