मुंबई - कोरोनाचे संकट टाळण्यासाठी मुख्यमंत्री व पंतप्रधान नरेंद्र मोदी भूमिका घेत आहेत. मात्र, याला राज्यातील भाजपा नेत्यांकडून विरोध होत आहे. यावरून भाजपाचे राज्यातील नेते मोदींचही ऐकत नाहीत, हे सिद्ध होते. सर्व प्रकार जनहितासाठी आहे, की मतांसाठी याचे उत्तर तेच देऊ शकतात, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी लगावला आहे. भाजपचे नेते लोकल ट्रेन सर्वसाधारण लोकांसाठी सुरू व्हावी व मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन करत आहेत. तर, दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी सणासुदीला गर्दी होणार असल्याने चिंतेत आहेत. त्यांनी त्याचपध्दतीने काळजी घेण्याचे निर्देश राज्यांना दिले आहेत, असेही ते म्हणाले.
भाजपाच्या दुटप्पी भूमिकेबद्दल नवाब मलिकांची तीव्र नाराजी -
दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येईल तसतशी अनलॉक प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे आधीच सांगितले आहे. मात्र, याउलट भाजपा नेते वागत असून मंदिरे उघडण्यासाठी व लोकल ट्रेन सुरू करण्यासाठी आंदोलने करत आहेत. या दुटप्पी भूमिकेबद्दल नवाब मलिक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
'सुशांतसिंग आत्महत्येप्रकरणी राज्याला बदनाम करण्याचेच कटकारस्थान'
सुशांतसिंग राजपूतच्या केसमध्ये ही हत्या की आत्महत्या होती, हे सीबीआयने एक वर्ष झाले, तरी स्पष्ट केले नाही. याचा अर्थ हे महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचे कटकारस्थान होते, असा थेट आरोप मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येचा तपास सीबीआयने ताब्यात घेऊन आज एक वर्ष पूर्ण झाले. मात्र, अजूनही यामध्ये सीबीआयने कोणताच खुलासा केला नाही, याबाबत शंका उपस्थित केली जात असल्याचेही ते म्हणाले.
हेही वाचा - बांग्लादेशी घुसखोर दाम्पत्याचा तुरुंगातच मुक्काम! वेश्या व्यवसायासाठी करण्यात आली होती सक्ती...