मुंबई - अनेक दिवसांपासून राज्यात एसटी कामगारांचे आंदोलन सुरू आहे. राज्य सरकारने बुधवारी एसटी कर्मचाऱ्यांची घसघशीत वेतनवाढ केली. त्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी या आंदोलनातून माघार घेत असल्याची घोषणा केली. आता एसटी कर्मचाऱ्यांचा संप संपला, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, त्यानंतर आंदोलनाचे नेतृत्व अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आपल्या हाती घेत, विलीनीकरणापर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा गुरुवारी दिला. यावरती शिवसेना नेते संजय राऊत भाष्य करत सदावर्ते यांच्यावरती टीका केली आहे. एसटी कामगारांना आपल्या कुटुंबाचा विचार करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.
काय म्हणाले संजय राऊत -
अनेक कर्मचारी हे आज कामावर परतले आहेत. काही लोक नौटंकी करत आहेत, त्यांना करू द्या. कामगारांनी आता कामावर येण्याची मनस्थिती तयार केली आहे. त्यांना भरघोस वेतनवाढ दिली आहे. कामगारांनी कामावर जाण्यातच त्यांचे आणि त्यांचे हित आहे. जे कोणी वकील आहेत. ते कामगारांना भडकावत आहेत. ते कामगारांना जगवायला येणार नाहीत. आम्ही गिरणी कामगारांची अवस्था पाहिली आहे. एसटी कर्मचारीही मराठी बांधव आहेत. त्यांनी शहाणपणाने आपला आणि आपल्या कुटुंबाचा विचार करावा आणि कामावर यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
२ हजार ९३७ कर्मचारी निलंबित
संपात सहभागी होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळाने निलंबनाची कारवाई सुरूच ठेवली असून, ९ नोव्हेंबरपासून आतापर्यंत २ हजार ९३७ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. महामंडळाने आज राेजंदारीवरील ३८० कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन व नियमाप्रमाणे एक महिन्याचे वेतनाचा धनादेश देऊन दाेन दिवसात ६१८ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केल्या.
हेही वाचा - NCP clarification : त्या फोटोवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून खुलासा...