मुंबई राज्यातील 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एस.टी. बस मधून मोफत प्रवास आणि दहीहंडी पथकातील गोविंदाना 10 लाखाचे विमा संरक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनाच्या पूर्व संध्येला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भातील घोषणा केली.
वयोवृद्ध नागरिकांना दिलासा सर्वसामान्यांना खूश करण्यासाठी राज्य सरकारने पंच्चाहतरी पूर्ण केलेल्या ज्येष्ठांना मोफत एसटी प्रवास स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन सेवेच्या बसेसमधून मोफत प्रवास करता येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा करून वयोवृद्ध नागरिकांना दिलासा दिला आहे. ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी प्रशासनावर टाकली आहे. कोणत्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल, याबाबतचे धोरण लवकरच ठरवले जाईल, अशी माहिती परिवहन विभागाच्या अधिकाऱ्याने दिली आहे.
गोविंदापथकांना दिलासा देण्याचा निर्णय दहीहंडी उत्सव तोंडावर आला असताना अनेक गोविंदा पथकानी विमा उतरवलेला नाही. आर्थिक टंचाईमुळे मंडळे विमा उतरवत नाहीत, अशी बाब अनेकदा समोर आली आहे. राज्य सरकारने याकडे लक्ष वेधत राज्यातील गोविंदापथकांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील अनेक गोविंदा पथकांची शासनाने विमा संरक्षण द्यावे, अशी मागणी होती. या मागणीनुसार गोविंदा पथकातील गोविंदांना आता 10 लाखाचे विमा संरक्षण शासन देणार आहे. या विमा संरक्षणाचे प्रीमियम शासनाकडून भरले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
शेतकरी हितासाठी निर्णय नैसर्गिक आपत्तीमध्ये यापूर्वी जिरायत शेतीसाठी 10 हजार रुपये प्रती हेक्टर ऐवजी त्यात बदल करून 13 हजार 600 रुपये प्रति हेक्टर, बागायत शेतीसाठी 27 हजार रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक शेतीसाठी 25 हजार रुपयांवरून ती आता 36 हजार रुपये प्रती हेक्टर मदत करण्यात आली आहे. यात 2 हेक्टरवरून 3 हेक्टर मर्यादा करण्यात आली आहे. यामुळे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्याला जवळपास दुपटीने मदत होईल. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदानाच्या निर्णयाची अंमबजावणी करण्यात येत आहे. शेतकरी हितासाठी आवश्यक ते सर्व निर्णय घेतले जातील, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले आहे.
हेही वाचा - Gondia Accident गोंदियात भगत की कोठी ट्रेनला अपघात 50 हून अधिक जखमी