मुंबई - आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी आणि एसटीचा महसूल वाढवण्याकरता एसटी महामंडळाने मालवाहतुकीचा निर्णय घेतला आहे. एसटीच्या मालवाहतुकीला कोरोना काळात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत 81 हजार 310 फेऱ्यातून साडेसहा लाख मेट्रिक टनाची मालवाहतूक करण्यात आलेली आहे. त्यातून एसटीला 47 कोटी 75 लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे.
दिवसाला 20 लाखांचा महसूल
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यभरातील एसटी महामंडळाची चाकं थांबली होती. त्यामुळे एसटी महामंडळाला कोट्यावधी रुपयांचा तोटा झाला आहे. परिणामी एसटी महामंडळाचा झालेला तोटा भरून काढण्यासाठी आणि महामंडळाचा महसूल वाढवण्याकरता 1 मे 2020 रोजी एसटीने मालवाहतूक क्षेत्रात पदार्पण केले होते. एसटीच्या प्रवासी गाड्यामध्ये काही अंशतः बदल करून मालवाहतुकीसाठी वाहन तयार करण्यात आले होते. सध्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात राज्यभरात 1 हजार 150 एसटीचे मालवाहतूक ट्रक आहेत. आतापर्यंत 1 कोटी 19 लाख किलोमीटर पर्यत मालवाहतूक करण्यात आली आहे. त्यातून एसटी महामंडळाला 47 कोटी 35 लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. विशेष म्हणजे आता प्रतिदिन सरासरी 260 एसटीच्या मालवाहतूक फेऱ्या होत असून, त्यातून दिवसाला 20 लाखांचा महसूल महामंडळाला प्राप्त होत आहे.
मालवाहतुकीच्या दरात तीनदा वाढ
एसटी महामंडळाने सुरुवातीला 32 रुपये प्रती किलो मीटर या दराने मालवाहतुकीचा व्यवसाय सुरू केलेला होता. नंतर 20 जुलै 2020 रोजी मालवाहतूकीचा दर 32 रुपयांवरून 35 रुपये प्रति किलोमीटर करण्यात आला. आता नव्या वर्षांत सतत इंधन दर वाढत असल्याने पुन्हा एकदा एसटी महामंडळाने मालवाहतुकीच्या दरात वाढ केली आहे. 100 किलोमीटर मालवाहतुकीसाठी प्रतिकिलोमीटर 46 रुपये तर 101 ते 250 किलोमीटर मालवाहतुकीसाठी 44 रुपये आणि 251 किमीच्या पुढील मालवाहतुकीसाठी 42 रुपये प्रति किलोमीटर दर निश्चित करण्यात आले आहेत.
हेही वाचा - माळेगाव ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीत, राज्य सरकारकडून शिक्कामोर्तब