मुंबई - कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महिलांची संख्या कमी आहे. तसेच सरकारने ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यासाठी सोमवारी २७ सप्टेंबरला महिलांसाठी तर मंगळवारी २८ सप्टेंबरला विद्यार्थी व शिक्षक यांच्यासाठी पालिकेने विशेष लसीकरण ड्राईव्ह आयोजित केले आहे.
लसीकरणासाठी २ दिवस विशेष सत्र -
कोविड-१९ प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिका कोविड १९ लसीकरण केंद्रांवर, सोमवार २७ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत, फक्त महिलांसाठी राखीव लसीकरण सत्र राबवले जाणार आहे. तसेच, मंगळवार २८ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या पहिल्या सत्रात, शिक्षक तसेच १८ वर्ष व त्यावरील वयाचे विद्यार्थी यांचे लसीकरण होईल. याच दिवशी दुसऱया सत्रात म्हणजे दुपारी ३ ते रात्री ८ या वेळेत, दुसरी मात्रा (डोस) देय असणाऱ्या नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. या दुपारच्या सत्रात कोणालाही कोविड लसीचा पहिला डोस दिला जाणार नाही.
हे ही वाचा -CORONA VIRUS : राज्यात शनिवारी 3,276 नवे रुग्ण, 58 रुग्णांचा मृत्यू
थेट येऊन लसीकरण -
महिला तसेच शिक्षक व विद्यार्थी यांना पहिला डोस घेऊन विहित कालावधी पूर्ण झाला असेल तर दुसरी मात्रा देखील घेता येईल. त्याचप्रमाणे, दुसरी मात्रा घेण्यासाठी येणाऱ्यांना, पहिला डोस घेतला असल्याचे प्रमाणपत्र देखील सोबत आणणे आवश्यक असेल. या दोन्ही दिवशी, मुंबईतील सर्व शासकीय व महानगरपालिका लसीकरण केद्रांवर थेट येऊन संबंधित घटकातील पात्र नागरिकांना लस घेता येईल. त्यासाठी ऑनलाईन पूर्व नोंदणीची आवश्यकता नाही. पात्र लाभार्थ्यांनी येताना शासकीय ओळखपत्र आणणे आवश्यक असेल. तसेच शिक्षक व विद्यार्थी यांनी शैक्षणिक संस्थांचे ओळखपत्र देखील सोबत आणणे आवश्यक आहे.
हे ही वाचा - राज्यातील महाविद्यालये लवकरच सुरू होणार; विद्यार्थ्यांनी तयारीत राहावे - उदय सामंत
जास्त प्रमाणात लाभ घ्यावा -
कोविड १९ विषाणू प्रतिबंधक लसीकरण अधिकाधिक वेगाने आणि सर्व स्तरातील नागरिकांपर्यंत नेण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका देखील प्रयत्नशील आहे. त्यासाठी या विशेष सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. कोविड १९ विषाणू प्रादुर्भाव पुन्हा वाढू नये, यासाठी प्रत्येक नागरिकाने कोविड लसीचे दोन्ही डोस घेवून लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. सबब, पात्र नागरिकांनी सदर सत्राचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा, असे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.