मुंबई - भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये गेल्या काही दिवसापासून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. शहर विभागात वीज जात असल्याने मुंबईकरांना विजेच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. वाढत्या तापमानामुळे विजेची मागणी वाढल्याने वीज खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. मात्र लागणारी अतिरिक्त वीज इतर कंपन्यांकडून विकत घेऊन शहरात लोडशेडिंग होऊ दिले जात नसल्याची माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली आहे.
या कंपन्यांकडून होतो वीज पुरवठा - मुंबई आर्थिक राजधानी असून जागतिक दर्जाचे शहर आहे. या शहराला बेस्ट, अदानी आणि महावितरण अशा तीन कंपन्याकडून वीज पुरवठा केला जातो. बेस्ट ही पालिकेची, महावितरण ही सरकारी तर अदानी ही खासगी वीज पुरवठा करणारी कंपनी आहे. बेस्टकडून कुलाब्यापासून सायन, माहीमपर्यंत वीज पुरवठा केला जातो. अदानीकडून बांद्रा ते दहिसर, कुर्ला ते मुलुंड आणि मानखुर्दपर्यंत वीज पुरवठा केला जातो.
मुंबई शहर विभागात अनेक कॉर्पोरेट कंपन्यांची कार्यालये, मंत्रालय, उच्च न्यायालय, स्टॉक एक्स्चेंज, अनेक बँकांची मुख्यालये, सरकारी कार्यालये आहेत. या विभागाला मुंबई महापालिकेच्या बेस्टकडून वीज पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसात शहर विभागात अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार समोर आले आहेत. अनेक विभागात काही तास वीज आली नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. यामुळे शहरातील पारा चढला असताना नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. वीज नसल्याने सरकारी, खासगी कॉर्पोरेट कार्यालये आदी ठिकाणी परिणाम दिसत आहे.
लोड शेडिंग होऊ देत नाही - दरम्यान याबाबत बेस्ट उपक्रमाशी संपर्क साधला असता, मुंबईत सध्या तापमान वाढले आहे. यामुळे एसी आणि फॅनचा वापर वाढला आहे. विजेची मागणी वाढल्याने अनेक वेळा वीज पुरवठा खंडित होत आहे. आमचे इंजिनियर आणि कर्मचारी फॉल्ट दुरुस्त करून वीजपुरवठा पूर्ववत करतात. बेस्टचा टाटा बरोबर करार झाला आहे. त्याप्रमाणे टाटा वीज पुरवठा करते. जी वीज कमी पडते ती इतर कंपन्यांकडून घेऊन आम्ही लोडशेडिंग होऊ देत नाही, असे बेस्टचे जनसंपर्क अधिकारी मनोज वऱ्हाडे यांनी सांगितले. तर वीज जाते आणि वीज येते यासाठी कधी कारवाई होत नाही, अशी माहिती महावितरण कंपनीचे जनसंपर्क अधिकारी अनिल कांबळे यांनी दिली.