मुंबई - काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एकनात शिंदे यांना विरोध असल्यामुळेच आपण मुख्यमंत्री झाल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली होती. यावर एकनाथ शिंदे यांनी जोरदार पलटवार केला आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांचा विरोध असण्याचे काहीच कारण नव्हते. उलट उद्धव ठाकरे यांनाच मला मुख्यमंत्री होऊ द्यायचे नव्हते, असा घणाघात एकनाथ शिंदे यांनी लगावला. शिवसेनेच्या नेत्यांना याबाबत विचारले असता, त्यावर बोलण्यास नकार दिला. मुख्यमंत्री पदाबाबतच्या वादावर विचारले असता, संजय राऊत यांनीदेखील याबाबत चुप्पी साधली आहे.
मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांच्या नावाची चर्चा - राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांच्या नावाची चर्चा होती. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकनाथ शिंदे यांना विरोध केल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. त्यानंतर मी मुख्यमंत्री पदावर बसल्याचेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले होते. मात्र यावर पलटवार करताना एकनाथ शिंदे यांनी आपण याबाबत अजित पवार यांच्याशी बोललो. त्यावर अजित पवारांनी तो तुमच्या पक्षातील निर्णय होता, आम्ही विरोध कशाला करणार असे सांगितल्याची माहिती एकनात शिंदे यांनी दिली.