मुंबई - सिनेसृष्टीत काम करण्याची अनेकांची इच्छा असते. मात्र ती प्रत्यक्षात उतरेलच हे सांगता येत नाही. परंतु जे जे रुग्णालयात महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सहाय्यक सुरक्षा अधिकारी रघुनाथ पालकर त्याला अपवाद आहेत. आपली सुरक्षारक्षकाची जबाबदारी सांभाळत त्यांनी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले आहे. मराठी, हिंदी मालिकासह वेब सिरीज आणि सुप्रसिद्ध अभिनेता नागार्जुन यांच्या एका सिनेमात काम करायची संधी त्यांना मिळाली आहे. साहित्य, गायन, सामाजिक कार्य या क्षेत्रात सध्या आपले स्थान कायम करत त्यांनी एक नवीन ओळख निर्माण केली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातून नोकरीच्या शोधात आले मुंबईत, रात्र शाळेत घेतले शिक्षण - रघुनाथ पालकर मुळचे रत्नागिरी जिल्ह्यातील आहेत. लांजा तालुक्यात पडवण, वेरवली खुर्द हे त्यांचे गाव आहे. एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. दहावीपर्यंत शिक्षण घेऊन कामानिमित्त ते मुंबईत आले. परळ येथील आर्यम भट्ट रात्र महाविद्यालयात त्यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतले. लहानपणापासूनच त्यांना सिनेसृष्टीत आणि नाट्य सृष्टीची आवड होती. शालेय, महाविद्यालय जीवनात सांस्कृतिक कार्यक्रमात काम केल्यामुळे चित्रपटात किंवा नाटकात काम करावे, अशी खूप इच्छा त्यांना होती. अखेर नशीबाने साथ दिली. कळवा परिसरात राहणारे अविनाश मांजरेकर यांच्याशी त्यांची ओळख झाली. सिनेसृष्टीत काम करण्याची इच्छा यावेळी त्यांनी बोलून दाखवली. मांजरेकर यांनी देखील हिरवा कंदील दाखवला आणि पालकर यांना सुवर्णक्षण साधता आला. आज ते मराठी, हिंदी मालिका, वेबसिरीज, चित्रपटात काम करत आहेत. विशेष म्हणजे बहुतांश ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका त्यांनी साकारली असून ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचे पाहायला मिळते.
फुलाला सुगंध मातीचा या सिरीयलमधून पोहोचले घराघरात - लोकप्रिय मालिका 'फुलाला सुगंध मातीचा'मध्ये पालकर यांनी पोलीस निरीक्षकाची भूमिका साकारली आहे. या भूमिकेमुळे ते घराघरात पोहोचले. जिल्हा, तालुका स्तरावर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. खात्यातील अनुभव आणि पद कामाला आल्याचे ते सांगतात. तर चांदणे शिंपित जाई या मराठी मालिकेत त्यांनी क्लार्कची भूमिका साकारली आहे. सध्या मन उडू उडू झालं या नव्या मालिकेत ते काम करत आहेत. महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या सहाय्यक अधिकारी पदाची जबाबदारी, आस्थापनेवर येणारे मोर्चे, आंदोलनकर्ते इतर संभाव्य धोके आदी गंभीर परिस्थिती प्रामाणिक आणि योग्य प्रकारे हाताळत आपली आवड जपण्याचे काम ते करत आहेत. शूटिंगच्या ठिकाणी जाण्यासाठी अनेकदा उशीर होतो. कधी कधी रात्रपाळी करून जावे लागते. तसेच कर्मभूमी असलेल्या सेवेत मालमत्ता आणि समाजाचे करण्यासाठी हजर व्हावे लागते, असे पालकर सांगतात.
नागार्जुन, अजय देवगण, मनोज वाजपेयी सोबत काम - ज्या व्यक्तींना पडद्यावर पाहिलं होतं, त्याच कलाकारांसोबत आज काम करताना वेगळा अनुभव मिळतो. मालिका स्वराज्य जननी जिजामातामध्ये प्रथम डॉ. अमोल कोल्हे यांच्या सोबत मावळ्याची भूमिका त्यांनी साकारली. डॉ. कोल्हे हे श्री छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करत होते. तसेच चिन्मय मांडलेकर, अतुल कुलकर्णी, संजय नार्वेकर, प्रवीण तरडे, भाऊ कदम, कुशल बद्रिके इत्यादी मराठी कलाकार तर अजय देवगण, मनोज वाजपेयी, रवी किशन, मनोज तिवारी, नवाब सिद्दीकी आणि नागार्जुन या सारख्या सुप्रसिद्ध सिने कलाकारांसोबत काम करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. नागार्जुन यांच्या वाईल्ड डॉग या सिनेमात एटीएस अधिकाऱ्याचे पात्र त्यांनी साकारले आहे. काळाघोडा येथे झालेल्या शूटिंग वेळी 'वही आदमी है', डायलॉग खूप गाजल्याचे पालकर सांगतात.