मुंबई - महापालिकेच्या राणीबागेत गेले बावीस वर्षे सिंहाचे दर्शन झालेले नाही. गुजरात येथून सिंहाची जोडी आणली जाणार असे जाहीर करण्यात आले आहे. मात्र तरीही गेल्या काही वर्षांत सिंहाची जोडी राणीबागेत आलेली नाही. यामुळे राणीबागेत गेल्या बावीस वर्षात सिंहाची डरकाळी ऐकू आलेली नाही. एकीकडे गुजरातमधून मुंबईत सिंह आले नसताना महाराष्ट्रातून मात्र गुजरातला हत्ती पाठवले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
बावीस वर्षे सिंहाचे दर्शन नाही - मुंबईत भायखळा येथे राणीबाग म्हणजेच वीरमाता जिजामाता भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय आहे. या राणीबागेत अनिता आणि जिमी अशा दोन सिंहिनी तसेच एका वाघाचा बावीस वर्षापूर्वी मृत्यू झाला होता. त्यानंतर राणीबागेत सिंहाचे आणि वाघाचे दर्शन झाले नव्हते. त्यांची डरकाळीही ऐकू लागली नव्हती. राणीबागेत वर्षभरापूर्वी औरंगाबाद प्राणी संग्रहालयातून वाघाची जोडी आणण्यात आली आहे. या वाघाच्या जोडीने एका पिल्लाला जन्मही दिला आहे. मात्र गुजरात येथून दोन सिंह आणणार असल्याची गेले काही वर्षे सांगितले जात असले तरी हे सिंह राणीबागेत आलेले नाहीत.
सिंह येण्यात अडचणी काय - राणी बागेत सिंहाची जोडी आणण्यासाठी गुजरातच्या प्राणी संग्रहालयाला प्रस्ताव देण्यात आला होता. सिंहाच्या बदल्यात गुजरातला झेब्राची जोडी दिली जाणार आहे. ही झेब्राची जोडी इस्रायल येथून आणली जाणार आहे. इस्रायलने राणीबागेचा प्रस्ताव फेटाळला होता. आता पुन्हा नव्याने प्रस्ताव बनवून पाठवण्यात आला आहे. यामुळे इस्रायल येथून आलेली झेब्राची जोडी गुजरातला दिली जाणार आहे. त्या बदल्यात राणीबागेला गुजरात येथून सिंहाची जोडी दिली जाणार आहे. लवकरच ही सिंहाची जोडी राणीबागेत येईल, अशी माहिती वीरमाता जिजामाता भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयाचे संचालक संजय त्रिपाठी यांनी दिली.
प्राणी आणण्याचा नियम - देशभरातील प्राणी संग्रहालयात कोणताही प्राणी आणायचा झाल्यास इतर प्राणी संग्रहालयातून आणावा लागतो. प्राणी संग्रहालयात आपसात करार करून प्राण्यांची आदलाबदल केली जाते. प्राण्यांची अदलाबदल करून आणण्याचा नियम असल्याची माहिती राणीबाग प्रशासनाकडून देण्यात आली.
हे प्राणी राणीबागेत येणार - राणीबागेत 2017 मध्ये हंबोल्ड पेंग्विन आणण्यात आले. त्यानंतर गेल्या एक ते फोन वर्षात औरंगाबाद सिद्धार्थ प्राणी संग्रहालयातून पट्टेदार वाघाची जोडी, बारासिंगा, पट्टेरी तरस, कोल्हे, अस्वल, बिबट्या आदी प्राणी आणण्यात आले आहेत. येत्या काळात गुजरातचा सिंह, परदेशातून कांगारू, झेब्रा, जिराफ आदी प्राणी आणले जाणार आहेत. जगात महाकाय म्हणून ओळखला जाणार अॅनाकोंडा नाग, अजगर, तस्कर, मण्यार, धामण, घोणस, मांडूळ, पाणसर्प, फुरसे, हरणटोळ असे सापही आणले जाणार आहेत.
काय आहे राणीबाग - इंग्लंडची राणी क्वीन व्हिक्टोरिया यांच्यासाठी भायखळा येथे उद्यान आणि प्राणी संग्रहालय उभारण्यात आले. 19 ऑक्टोबर 1862 रोजी लेडी कॅथरीन फ्रेअर यांनी बागेचे उद्घाटन केले. या बागेत 300 हुन अधिक प्राणी आणि पक्षी आहेत. 286 प्रजातींची 3213 वृक्ष आणि 853 वनस्पती आहेत.
रेकॉर्ड ब्रेक महसूल - राणीबागेला गेल्या काही वर्षांत 22 दिवसात 1 कोटी रुपयांचा महसूल मिळाला नव्हता. मे 2022 मध्ये 22 दिवसात राणीबागेला 1 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. या आधी नोव्हेंबर 2021 मध्ये 68 लाख, डिसेंबर 2021 मध्ये 75 लाख, मार्च 2022 मध्ये 84 लाख, एप्रिल 2022 मध्ये 69 लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. राणीबागेला एप्रिल 2014 पासून मे 2022 या 8 वर्षांच्या कालावधीत 93,03,051 पर्यटकांनी भेट दिली असून 21 कोटी 93 लाख 49 हजार 333 महसुल प्राप्त झाला असल्याची माहिती त्रिपाठी यांनी दिली.
सिंह आले नाही मात्र हत्ती जाणार - गुजरातच्या प्राणी संग्रहालयातून राणीबागेत सिंहाची जोडी आणली जाणार आहे. गेल्या तीन वर्षात ही सिंहाची जोडी महाराष्ट्र्रात मुंबईत आलेली नाही. मात्र महाराष्ट्रातील ताडोबा अंधारी प्रकल्पासह गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर व पातानील येथील एकूण 13 हत्ती गुजरातमधील जामनगर येथे पाठविण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे.