मुंबई - राज्यसभेत सहावा उमेदवार आपल्या पक्षाचा निवडून यावा यासाठी महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्षाकडून कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. मात्र यासोबतच मत बाद होऊ नये, यासाठी आमदारांना प्रशिक्षण दिले जात आहे. महाविकास आघाडीने तर आपले सर्व आमदार पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवून त्यांना याबाबतचे प्रशिक्षण दिले आहे. तर भारतीय जनता पक्षाकडून देखील आपल्या आमदारांना याबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मतदान बाद होऊ नये, यासाठी नेमकी कोणती दक्षता घ्यावी लागते याबाबतचा हा खास रिपोर्ट.
दोन्ही पक्षाकडून घेतली जात दक्षता - राज्यसभा निवडणुकीत आपला उमेदवार निवडून यावा यासाठी भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडीने आपली सर्व ताकद पणाला लावत आहे. प्रत्येक लहान पक्ष आणि अपक्ष आमदारांनी आपल्या उमेदवाराच्या बाजूने मतदान करावे, यासाठी चर्चा आणि बैठकांचे सूत्र दोन्ही बाजूने सुरू आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान कसे करायचे, याबाबतच्या सूचना भारतीय जनता पक्ष आणि महा विकास आघाडीकडून आमदारांना देण्यात येत आहेत. जेणेकरून एकही मत बाद होऊन त्याचा थेट फटका विजयावर होऊ नये, याची दक्षता दोन्ही पक्षाकडून घेतली जात आहे.
24 वर्षानंतर राज्यसभा निवडणूक - सहा जागांसाठी दहा जूनला होणारी राज्यसभा निवडणूक ही राज्यांमध्ये जवळपास 24 वर्षानंतर होत आहे. प्रत्येक वेळी विरोधी आणि सरकारी पक्षाने सामंजस्याने ही निवडणूक बिनविरोध घडवून आणली होती. मात्र यावेळेस महाविकास आघाडी आणि विरोधी असलेल्या भारतीय जनता पक्षाने सहाव्या जागेसाठी आपला उमेदवार उभा केला आहे. त्यामुळे 24 वर्षानंतर राज्यामध्ये राज्यसभेची निवडणूक होत आहे. त्यातच मतदान करण्याची प्रक्रिया काहीशी किचकट असल्यामुळे आमदारांना याबाबतचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. त्यामुळेच महाविकास आघाडीने आपले सर्व आमदार गेल्या दोन दिवसापासून मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवून मतदान करताना कोणती दक्षता पाळली गेली पाहिजे, कोणत्या चुका करू नयेत, याबाबत आपल्या आमदारांना प्रशिक्षण दिले आहे.
मुख्यमंत्र्यांनी लगावला भारतीय जनता पक्षाला टोला - भारतीय जनता पक्ष ही आपल्या सर्व आमदारांना याबाबत प्रशिक्षण देणार आहे. सहाव्या उमेदवाराला 42 मतांचा कोटा पूर्ण न झाल्यास दुसऱ्या पसंतीच्या मतदानाची मतमोजणी केली जाऊ शकते. आणि त्यामुळे दुसऱ्या पसंतीची मतदान करतानाही कोणती काळजी घ्यावी याबाबत सर्व आमदारांना दोन्ही पक्षाकडून सूचना देण्यात येत आहेत. राजकीय सभ्यता पाळत यावेळची ही निवडणूक व्हायला नको होती. मात्र सध्या राजकारण आणि सभ्यता या दोन परस्पर विरोधी गोष्टी झाल्या आहेत. मात्र असे असले, तरी राजकारणात सभ्यता असायला हवी असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी भारतीय जनता पक्षाला टोलाही लगावला होता.
अशी असणार मतदानाची नियमावली - प्रत्येक आमदाराला मतदानाला जाण्यापूर्वी निवडणूक अधिकाऱ्याकडून पेन दिला जातो. त्याच पेनचा वापर करत, पहिला, दुसरा आणि तिसऱ्या पसंतीच्या कर्माचा उल्लेख मतपत्रिकेवर करावा लागतो. त्या पेना व्यतिरिक्त कोणत्याही इतर पेन-पेन्सिलचा त्यासाठी वापर करता येत नाही. आमदारांनी चुकून इतर पेन पेन्सिल वापरल्यास ती मतपत्रिका बाद ठरवली जाते.
आमदारांसाठी मार्गदर्शक तत्वे - मतदार आमदारांनी मतपत्रिकेवर कोणतेही चिन्ह किंवा नावाचा उल्लेख करायचा नसतो. तसेच मतपत्रिकेवर इतर कोठेही अंक किंवा चिन्ह काढल्यास मतपत्रिका बाद होते. मतपत्रिकात दिलेल्या नावाच्या पुढे मतदार आमदाराला केवळ पसंतीक्रम द्यावा लागतो. यामध्ये स्पष्ट संख्येत किंवा रोमन अंकात 1, 2, किंवा 3 असा पसंतीक्रम द्यायचा असतो. फक्त एकाच उमेदवाराला पहिला क्रमांकाचा पसंतीक्रम देता येतो. जेवढे उमेदवार निवडणुकीत सहभागी झालेले असतात, त्यापैकी प्रत्येकाला आपला पसंतीक्रम मतदार आमदाराला द्यावा, अशी सक्ती नसते. मतपत्रिकेवर मतदार आमदार यांनी कोणत्याही प्रकारची आपली सही किंवा इतर अक्षर लिहायचे नसते.
ही मतपत्रिका होऊ शकते बाद
- ज्या मतपत्रिकेवर पहिला क्रमांक नसेल आणि इतर क्रमांक दिले असतील तर ती मतपत्रिका बाद होऊ शकते.
- उमेदवाराच्या नावापुढे स्पष्ट 1 अंक दिसणे गरजेचे आहे. दोन नावाच्या मध्ये 1 अंक असल्यास मतपत्रिका बाद होते.
- एकाच उमेदवाराच्या पुढे 1, 2, 3 असे केल्यास मतपत्रिका बाद होते.
- पसंतीक्रम शब्दांमध्ये दर्शवला तर मतपत्रिका बाद होते.
- निवडणूक अधिकाऱ्याने दिलेल्या पेनाने मतपत्रिकेत अंक लिहायचा असतो, इतर पेनाने अंक लिहिल्यास मतपत्रिका बाद होते.