मुंबई - देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरातील महापालिकेवर गेले 25 वर्षांहून अधिक काळ शिवसेनेची सत्ता आहे. शिवसेनेचा मित्र पक्ष असलेल्या भाजपाने विरोधात जाऊन मिशन मुंबईची घोषणा केली आहे. भाजपा शिवसेनेला कडवे आव्हान उभे करणार असतानाच काँग्रेसनेही महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली. उद्धव ठाकरे यांनीही शिवसैनिकांनी निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे. यामुळे मुंबई महापालिकेच्या 2022 च्या निवडणुकीची सव्वा वर्षे आधीच सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरू केल्याचे चित्र आहे. मात्र मुंबईत राज्याप्रमाणे महाविकास आघाडी होईल, अशी अपेक्षा महापौरांनी व्यक्त केली आहे. वाचा हा खास रिपोर्ट...
भाजपाचा संकल्प
मुंबई महापालिकेवर गेले 25 वर्षांहून अधिक काळ शिवसेनेची सत्ता आहे. या सत्तेच्या काळात भाजपा शिवसेनेचा मित्रपक्ष होता. मात्र गेल्या वर्षी शिवसेना आणि भाजपाची युती तुटल्यावर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडी स्थापन करत सरकार स्थापन केले. शिवसेनेने सरकार स्थापन केल्याने भाजपाने विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतला. महापालिकेतही भाजपा विरोधी बाकावर बसली. भाजपाने विरोधी बाकावर बसून शिवसेनेला कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडलेली नाही. कालच झालेल्या भाजपा कार्यकारिणीच्या बैठकीत मुंबई महापालिकेवर स्वच्छ भगवा फडकवण्याचा संकल्प करत मिशन महापालिका 2022 ची घोषणा केली आहे.
काँग्रेस स्वबळावर
पालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. तर, काँग्रेस विरोधी पक्षात बसली आहे. मुंबईकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सत्तेत बसलेल्यांवर अंकुश लावण्याचे काम करत असल्याचे वक्तव्य विरोधीपक्ष नेते रवी राजा यांनी केले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी 'मी पुन्हा येईन, पुन्हा येईन' असे म्हटले होते. मात्र ते काही परत आलेले नाहीत. सध्या वातावरण बदलले आहे. राज्यात महाविकास आघाडी असली, तरी स्थानिक पातळीवर काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवावी, अशी स्थानिक कार्यकर्त्यांची भावना आहे. कार्यकर्त्यांनी आपली भावना महाराष्ट्र प्रभारी एच.के.पाटील यांच्यासमोर बैठकीत मांडली आहे. मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवावी की आघाडीसोबत, याचा निर्णय काँग्रेस हायकमांड आणि मुंबई अध्यक्ष घेतील, असे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी सांगितले.
शिवसैनिकांना सज्ज राहण्याचे आवाहन
एकेकाळी मित्रपक्ष असलेला भाजपा शिवसेनेचा वैरी बनला आहे. भाजपाने मिशन मुंबईची घोषणा करताच शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईमधील पदाधिकाऱ्यांची वर्षा बंगला येथे बैठक घेतली. या बैठकीत पालिका निवडणुकीसाठी शिवसैनिकांनी सज्ज रहावे. आता पासून कामाला लागा. आपण कुठे कमी पडलो हे पहा आणि अधिक जोमाने कामाला लागा, असा सल्ला आमदार प्रकार फारर्पेकर यांनी दिला आहे. कोरोना काळात शिवसैनिकांनी केलेल्या कामाचं मुख्यमंत्र्यांनी कौतुक करत मनोधैर्य वाढवलं आहे. कोरोनाच्या काळात नागरी कामे करता आली नाहीत. पण आता कोणतंही संकट आल्यावरही काम करायचंय, असा निश्चय त्यांनी बोलून दाखलवला.
तिहेरी लढत पाहायला मिळणार
मुंबई महापालिकेची निवडणूक 2017 मध्ये झाली होती. त्यावेळी शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी हे सर्व पक्ष वेगळे निवडणूक लढले होते. आता महापालिकेची निवडणूक 2022 मध्ये होणार आहे. ही निवडणूक भाजपा विरोधात महाविकास आघाडी, अशी होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र काँग्रेसनेही स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. यामुळे आता ही निवडणूक तिहेरी होण्याची शक्यता आहे. शिवसेना, भाजपा, काँग्रेस अशी निवडणूक लढवली जाईल, असे चित्र सध्या आहे. शिवसेनेची राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्ष यांच्या सोबत देखील युती होऊ शकते.
आघाडीची अपेक्षा
मुंबई महापालिका निवडणूक शिवसेना आणि काँग्रेस वेगळी लढेल, असे राजकीय चित्र निर्माण झाले असतानाच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचे नेते एकत्र येऊन निवडणूक लढवण्यावर निर्णय घेतील. महाविकास आघाडी राज्यात आहे. त्याचप्रमाणे ती मुंबई महापालिका निवडणुकीतही होईल, अशी अपेक्षा महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केली आहे.
पालिकेतील संख्याबळ
शिवसेना - 96
भाजपा - 84
काँग्रेस - 29
राष्ट्रवादी - 9
समाजवादी - 6
एमआयएम - 2
मनसे - 1