मुंबई - मनी लॉन्ड्रिंग संदर्भात तपास करत असलेल्या ईडीकडून टॉप सिक्युरिटीचा मालक अमित चांदोले यास अटक केल्यानंतर त्याच्या वाढीव ईडी कस्टडीसाठी विशेष न्यायालयामध्ये मागणी करण्यात आली होती. मात्र, विशेष न्यायालयाने अमित चांदोले याची ईडीला कस्टडी देण्यास नकार दिला होता. विशेष न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात ईडीकडून उच्च न्यायालयामध्ये दाद मागण्यात आली होती. यात उच्च न्यायालयाने विशेष न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली. यानंतर विशेष न्यायालयाने अमित चांदोले याची 9 डिसेंबरपर्यँत ईडी कस्टडीत रवानगी केली आहे.
भक्कम पुरावे व साक्षीदार असल्याचा ईडीचा दावा
उच्च न्यायालयातील या याचिकेत ईडीने म्हटले होते की, ईडीकडे मनी लॉन्ड्रिंग संदर्भात अमित चांदोले व प्रताप सरनाईक यांच्या दरम्यान झालेल्या व्यवहारासंबंधी पुरावे व साक्षीदार आहेत. तरीसुद्धा विशेष न्यायालयाकडून आरोपीची कस्टडी देण्यात आली नाही. ईडी कस्टडीत प्रताप सरनाईक यांचा या प्रकरणातील सहभाग उघड होईल, असा ईडीने दावा केला आहे.
प्रताप सरनाईक यांचे नाव घेण्यासाठी माझ्यावर दबाव
महत्त्वाचं म्हणजे अमित चांदोले यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये ईडीच्या विरोधात आरोप करताना म्हटले आहे की, प्रताप सरनाईक यांचं नाव याप्रकरणी घेण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला जात आहे. ईडी कस्टडीमध्ये माझ्यावर तशा प्रकारची बळजबरी करत असल्याचा आरोप अमित चांदोले याने केला होता. मात्र, ईडीने अमित चांदोलेचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. दरम्यान, दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने या संबंधातला निर्णय राखून ठेवलेला आहे.
प्रताप सरनाईक यांना तिसऱ्यांदा समन्स
ईडी चौकशी दरम्यान आपली बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी आपल्याला चौदा दिवसांचा वेळ द्यावा, अशी मागणी प्रताप सरनाईक यांच्या लीगल टीमकडून ईडीला करण्यात आलेली होती. मात्र, यावर कुठलीही वेळ वाढवून देण्यास स्पष्टपणे नकार देत तिसऱ्यांदा प्रताप सरनाईक यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. येत्या गुरुवारी प्रताप सरनाईक यांना ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी हजर व्हावे लागणार आहे.
काय आहे प्रकरण?
एमएमआरडीएने मुंबई आर्थिक गुन्हे शाखेत केलेल्या तक्रारीनुसार, टाॅप्स सिक्युरिटीचे मुख्य भागीदार अमित चंदोले यांनी एमएमआरडीए करता सुरक्षा रक्षक पुरवण्याचे मोठे कंत्राट घेतले होते. त्या कंत्राटाकरता अमित चंदोले आणि कंपनीने १७५ कोटी रुपये घेतले होते. मात्र कोणतीही सुविधा न देता है पैसे अमित चंदोले यांनी लाटल्याचा आरोप करण्यात आला आहे.
हेही वाचा - आम्हाला दहा टक्के आरक्षण द्या, वंजारी समाजाची मगाणी
हेही वाचा - मनी लॉन्ड्रिंग प्रकरण : अमित चांदोलेची न्यायालयीन कोठडी रद्द; ईडीला पुन्हा मिळणार त्याची कस्टडी